संग्राम थोपटेंना काॅंग्रेसमध्ये स्पर्धक : माजी खासदाराच्या मुलाने भोरसाठी मागितली उमेदवारी

संग्राम थोपटेंना काॅंग्रेसमध्ये स्पर्धक : माजी खासदाराच्या मुलाने भोरसाठी मागितली उमेदवारी

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दहा विधानसभा मतदारसंघांत कॉंग्रेसच्या उमेदवारीकरिता केवळ 20 जण इच्छुक आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघात कॉंग्रेसकडे एकही इच्छुक नाही. 

जुन्नर, खेड, दौंड आणि इंदापूर या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी एक जण इच्छुक आहे. एकूणच जिल्हा कॉंग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी निरुत्साह दिसत आहे. 

कॉंग्रेस इच्छुकांच्या मुलाखती सोमवारी घेण्यात आल्या. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे निरीक्षक प्रकाश यलगुलवार (सोलापूर), सत्यजित देशमुख (सांगली), अल्का राठोड (सोलापूर), माजी खासदार अशोक मोहोळ आणि पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी या मुलाखती घेतल्या. या मुलाखतींचा अहवाल पक्षाचे निरीक्षक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर विधानसभानिहाय अधिकृत उमेदवाराचे नाव निश्‍चित करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष जगताप यांनी सांगितले. 

इंदापूरमधून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जुन्नरमधून विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, खेडमधून अमोल पवार आणि दौंडमधून आत्माराम ताकवणे इच्छुक आहेत. 
विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुक - आंबेगाव- यशवंत पाचंगे व अशोक काळे, शिरूर- शिवदास काळभोर, कौस्तुभकुमार गुजर, महेश ढमढेरे, पुरंदर- कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष संजय जगताप आणि माजी आमदार संभाजी कुंजीर, भोर- आमदार संग्राम थोपटे, माजी खासदार अशोक मोहोळ यांचे चिरंजीव संग्राम मोहोळ, डॉ. यमराज पारखी, मावळ- निखिल कवीश्‍वर, खंडू तिकोने, चंद्रकांत सातकर, दिलीप ढमाले, शांताराम नरवडे आणि बाळू प्रताप.

पुणे शहर आणि ग्रामीण भागात मोडणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्याही मुलाखती आज घेण्यात आल्या. या मतदारसंघातून मिलिंद पोकळे, श्रीरंग चव्हाण, सचिन बराटे, संग्राम मोहोळ, लहू निवंगुणे, अर्चना शहा आणि बाळू प्रताप या सात जणांनी मुलाखती दिल्या. माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या चिरंजीव संग्राम यांनी भोरमधून उमेदवारी मागितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकीयदृष्ट्या मोहोळ कुटुंब सध्या बाजूला फेकले गेले आहे. अचानक संग्राम यांनी भोरसाठी उडी घेतली आहे. भोर मतदारसंघात मुळशी तालुक्याचा समावेश होतो. त्यामुळे मुळशीला प्रतिनिधित्व मिळावे, असा आग्रह मोहोळ यांचा आहे.  पुरंदरमध्ये संजय जगताप यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी माजी आमदार संभाजीराव कुंजीर यांनीही उमेदवारी मागितली आहे. 

मतदारसंघनिहाय इच्छुकांची संख्या 
जुन्नर- 1, आंबेगाव- 2, खेड- 1, शिरूर- 3; दौंड- 1, इंदापूर- 1, पुरंदर- 2, भोर- 3, मावळ- 6 आणि बारामती- 00. 

हर्षवर्धन पाटील, थोपटे इच्छुक 
आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वंच विधानसभा मतदारसंघांतून इच्छुकांचे अर्ज मागवले आणि मुलाखतीही घेतल्या आहेत. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील इंदापूर; तर भोरचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे पुन्हा एकदा भोरमधून कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com