पोलिस आयुक्तपदासाठी मुंबईत जोरदार रस्सीखेच! संजय बर्वे यांच्या जागी कोण?

मुंबईचा पोलिस आयुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांच्या मान्यतेनंतर ठरणार...
sanjay barve
sanjay barve

मुंबई ः राज्यातील महत्त्वाचे मानले जाणारे मुंबई पोलिस आयुक्तपद फेब्रुवारी महिनाअखेर रिक्त होणार आहे. त्यामुळे या पदावर विराजमान होण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

परमबीर सिंग, सदानंद दाते, रश्‍मी शुक्‍ल, हेमंत नगराळे, के. व्यंकटेशम यांची नावे या पदासाठी चर्चेत असली, तरी शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांचे कोणत्या अधिकाऱ्यावर एकमत होते, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना तीन-तीन महिने असा एकूण सहा महिन्यांचा कार्यकाल वाढवून मिळाल्यानंतर ते महिना अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर नियुक्त होण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी "फिल्डिंग' लावली आहे. कोणी "मातोश्री'च्या पायऱ्या झिजवत आहेत, तर काहींनी "सिल्वर ओक'वर रात्री-बेरात्री हजेरी लावत आपण कसे निष्ठावान आहोत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

भलेही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले, तरी प्रशासकीय निर्णय व राजकीय धोरण हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार ठरत आहेत. नुकत्याच झालेल्या "आयएएस' अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधून ही झलक दिसून आली. त्यामुळे महाविकास आघाडीप्रति आपली निष्ठा दाखवण्यास काही अधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे.

दरम्यान, महिनाअखेर राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल प्रतिनियुक्तीवर केंद्रात गेले, तर राज्यात समीकरणे बदलण्याची शक्‍यता आहे; पण सध्या तरी तशी शक्‍यता धुसर असल्यामुळे येणाऱ्या काळात आयुक्तपदासाठी मोठ्या हालचाली होतील.

कुणाचे पारडे किती जड?
- परमबीर सिंग - ठाण्याचे आयुक्त असताना भाजप नेत्यांसह शिवसेनेच्याही जवळचे होते. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सिंचन गैरव्यवहार प्रकरणात मिळालेला दिलासा पाहता सिंग यांना राष्ट्रवादीकडूनही हिरवा कंदील मिळू शकेल.
- रश्‍मी शुक्‍ल- सेवाज्येष्ठतेनुसार मुंबईच्या पहिल्या महिला पोलिस आयुक्तपदाचा मान मिळावा, यासाठी रश्‍मी शुक्‍ल सज्ज आहेत.
- सदानंद दाते -कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात "फोर्स वन'चे प्रमुख, मुंबईचे कायदा अणि सुव्यवस्था विभागाचे सह-पोलिस आयुक्त आणि गुन्हे शाखेचे प्रमुखपद भूषवलेले सदानंद दातेही शर्यतीत आहेत. मराठी अधिकारी व त्यात स्वच्छ प्रतिमा त्यांच्या पथ्यावर पडू शकेल.
- हेमंत नगराळे आणि के. व्यंकटेशम - सेवा ज्येष्ठतेनुसार शर्यतीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com