Compensation for family of deceased government employee on election duty | Sarkarnama

इलेक्शन ड्युटीवर मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याच्या परिवाराला 15 लाख रुपये 

दिनेश गोगी 
सोमवार, 6 मे 2019

एखाद्या कर्मचाऱ्याचा निवडणुकीचे काम करताना मृत्यु झाल्यास त्याच्या परिवाराला 15 लाख रुपये देण्याची तरतूद निवडणुकीच्या परिपत्रका मध्ये आहे.

उल्हासनगर : निवडणुकीचे काम करतेवेळी उल्हासनगर पालिकेचे कर्मचारी भगवान मगरे यांचा मृत्यु झाला होता.निवडणुकीच्या परिपत्रका नुसार मगरे यांच्या परिवाराला 15 लाख रुपये मिळावेत असा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश नार्वेकर यांना पाठवण्यात आल्याची माहिती उपविभागीय तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी दिली.

रविवारी 28 तारखेला म्हारळ गाव रिजेन्सी निर्माण येथील खुल्या मैदानातून ईव्हीएमचे वाटप करण्यात आले. उल्हासनगर महापालिकेत आरोग्य विभागात सफाई कामगार पदावर कार्यरत असलेले भगवान मगरे(54) यांची उल्हासनगर विधानसभेच्या मीनल अर्जुन चौहान विद्यालयातील बूथ क्रमांक 87 येथे नेमणूक  करण्यात आली होती. भगवान मगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ईव्हीएम आणि साहित्य घेऊन दुपारी 12 वाजताच्या सुमारास मीनल अर्जुन चौहान विद्यालयातील बूथ गाठला.

बूथ प्रमुखांच्या आदेशाने मतदान केंद्रावर साहित्य लावून झाल्यावर भगवान मगरे यांनी जेवण केले. त्यानंतर खुर्चीवर बसलेले मगरे हे अचानक खाली कोसळले. त्यांना बूथ प्रमुखांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी त्यांना मयत घोषित केले होते.त्यादिवशी 40 डिग्री तापमान होते.त्यात त्यांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला होता.

एखाद्या कर्मचाऱ्याचा निवडणुकीचे काम करताना मृत्यु झाल्यास त्याच्या परिवाराला 15 लाख रुपये देण्याची तरतूद निवडणुकीच्या परिपत्रका मध्ये आहे. त्यानुसार  मगरे यांच्या परिवाराला 15 लाख रुपये मिळावेत असा प्रस्ताव जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना पाठवण्यात आल्याचे जगतसिंग गिरासे यांनी सांगितले.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख