'कम व्हाॅट मे' भाजपने पालघर जिंकलेच

शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या राज्यात सत्तेवर असलेल्या युतीच्या दोन्ही पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत अखेर भाजपाने बाजी मारली.
Fadanvis -Thackeray
Fadanvis -ThackeraySarkarnama

पुणे : शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या राज्यात सत्तेवर असलेल्या युतीच्या दोन्ही पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत अखेर भाजपाने बाजी मारली. कुठल्याही परिस्थितीत (कम व्हाॅट मे) ही निवडणूक जिंकून द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले होते. शेवटी ही निवडणूक भाजपने जिंकलीच.

पालघर हा अनुसुचित जमातींसाठी राखीव मतदार संघ होता. 2008 मध्ये झालेल्या मतदारसंघांच्या फेररचनेत हा मतदार संघ राखीव झाला. आदिवासी, उत्तर भारतीय, मराठी भाषक, गुजराती व मारवाडी आणि ख्रिश्चन अशी या मतदारसंघाची लोकसंख्येची विभागणी आहे. हा मतदार संघ शहरी आणि आदिवासी अशा दोन भागांमध्ये प्रामुख्याने विभागला गेला आहे.

शिवसेनेने ही लढाई प्रतिष्ठेची केली असून, भाजपविरुद्ध शिवसेना एवढ्यापुरतीच ही निवडणूक मर्यादित न राहता मुख्यमंत्री विरुद्ध एकनाथ शिंदे असे स्वरूप आले आहे. ही निवडणूक साम-दाम-दंड-भेद निती वापरून जिंका या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्याचे शिवसेनेने भांडवल केले होते. त्यावरुन निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली होती.

या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला चांगली टक्कर दिली, हे मान्य केले पाहिजे. एकतर भाजपच्या मतदारसंघात शिवसेनेने आपला उमेदवार उभा केला. भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या मुलाला आपल्याकडे खेचत त्यांनी भाजपला डिवचले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेली आक्रमक रणनिती यावर कडी करुन गेली. श्रीनिवास वनगा हा आपल्या हक्काचा उमेदवार शिवसेनेने पळवल्यानंतर भाजपने थेट काँग्रेसच्या गोटात हात घातला आणि अगदी आयत्यावेळी काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांना आपल्याकडे खेचले. हा काँग्रेसला मोठा धक्का होता.

भाजपाने या मतदारसंघात जात आणि भाषा या दोन मुद्द्यांवर आपली रणनिती आखली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आयोजित केलेली जाहीर सभा हा याच रणनितीचा एक भाग होता. त्या व्यतिरिक्त भोजपुरी अभिनेते व दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनाही प्रचारासाठी आणण्यात आले होते. इथली उत्तर भारतीय मते भाजपने या प्रचाराच्या जोरावर आपणाकडे खेचण्यात यश मिळवले. त्याचा चांगलाच फटका काँग्रेसला बसला.

कुठल्याही परिस्थितीत निवडणुका जिंकायच्याच हे नरेंद्र मोदी - अमित शहांचे सूत्र भाजपने पालघरमध्येही वापरल्याचे दिसते. दुसऱ्या पक्षाचा आघाडीचा उमेदवार फोडणे, दिवंगत चिंतामण वनगा यांचे पूत्र शिवसेनेकडून लढत असतानाही चिंतामण वनगांच्या फोटोचा निवडणुकीच्या प्रचारात वापर करणे, असे सर्व फंडे भाजपने या निवडणुकीत वापरले. थोडक्यात काहीही करा पण निवडणूक जिंका हाच फाॅर्म्यूला या निवडणुकीत उपयोगी पडला.

पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यातील दोन विधानसभा मतदारसंघ सर्वसाधारण जागांना खुले, तर चार अनुसुचित जाती म्हणजे आदिवासींसाठी राखीव आहेत. सहापैकी वसई (हितेंद्र ठाकूर), नालासोपारा (क्षितीज ठाकूर) आणि बोईसर (विलास तरे) मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत. डहाणू (पास्कल धनारे) आणि विक्रमगड (विष्णू सावरा) भाजपच्या ताब्यात आहेत तर पालघरमध्ये अमित घोडा हे शिवसेनेचे आमदार आहेत.

देशभरात ज्या पोटनिवडणुका झाल्या त्यात भाजप विरुद्ध अन्य सर्व असे चित्र होते. ज्या ठिकाणी हे चित्र प्रत्यक्षात उतरले तिथे भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचे दिसते. पालघरमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अशी लढत होती. यातील शिवसेना सोडली तर उर्वरित तीन पक्षांची मते एकत्र केली तर त्या मतांची संख्या भाजपच्या मतांपेक्षा जास्त होते. पण तसे घडले नाही आणि हेच भाजपच्या पथ्यावर पडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com