बॅगा भरा, मुंबईत या; उध्दव ठाकरेंचे शिवसेना आमदारांना आदेश - अब्दुल सत्तार 

बॅगा भरा, मुंबईत या; उध्दव ठाकरेंचे शिवसेना आमदारांना आदेश - अब्दुल सत्तार 

औरंगाबादः बॅगा भरा, मुंबईत या, सोबत चार-पाच दिवस पुरतील एवढे कपडे आणि आधार, पॅनकार्डही आणा असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आमदारांना दिले असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी प्रसारमाध्यमाशी बोलतांना दिली आहे.

येत्या 25 किंवा 26 तारखेला राज्यात सत्ता स्थापन होऊन शपथविधी होऊ शकतो असा दावा देखील सत्तार यांनी यावेळी केला. 

राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच काही केल्या सुटत नाहीये. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सुरू असलेले तळ्यातमळ्यात, शरद पवारांनी अलीकडेच केलेली विधाने, पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत घेतलेली भेट यामुळे महाशिवआघाडीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. शिवसेनेकडून मात्र राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होऊन आमचाच मुख्यमंत्री होईल असे सांगितले जातेय. 

या पार्श्‍वभूमीवर मुंबईत असलेले अब्दुल सत्तार यांनी सरकार स्थापनेविषयी दावा केला आहे. सत्तार म्हणाले, येत्या एक-दोन दिवसांत शिवसेनेच्या सर्व 56 आमदारांना मुंबईत येण्याच्या सूचना उध्दव ठाकरे यांनी दिल्या आहेत. विशेष म्हणजे सोबत येतांना चार-पाच दिवस पुरतील एवढे कपडे, आधार आणि पॅनर्काड देखील ठेवावे असे सांगण्यात आले आहे. 

एकंदिरत सुरू असलेल्या घडमोडी आणि हालचाली पाहता 25-26 नाव्हेंबर दरम्यान राज्यात सरकार स्थापन होऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असे दिसते. मुंबईत जास्त दिवस थांबण्याची गरज पडू शकते हे गृहित धरूनच आमदारांना आवश्‍यक ते कपडे सोबत आणण्यास सांगितले असावे. आधार आणि पॅनकार्ड देखील आणा या सूचनेमुळे लवकरच राज्यात सत्ता स्थापन होईल असे वाटते. 

कारण राज्यपालांकडे जेव्हा सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल तेव्हा राज्यपाल महोदयांकडे असलेली आमदारांची माहिती आणि ओळखपत्र किंवा पॅन, आधारच्या माध्यमातून ती पडताळली जाईल. अशावेळी एखाद्या आमदाराकडे ओळख पटवण्याचा पुरावा नसेल तर अडचण निर्माण होऊ शकते आणि ती होऊ नये यासाठीच खबरदारी म्हणून आधार आणि पॅनकार्ड आणण्यास आमदारांना सांगितले असावे असे सत्तार यांनी सागंतिले. 

उध्दव ठाकरेंच्या नावाला पसंती 

राज्यात मुख्यमंत्री कोण असेल याबद्दल सांगतांना " पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नावाला सर्व आमदारांची पहिली पसंती आहे, त्यांनीच मुख्यमंत्री व्हावे अशी सगळ्यांची इच्छा असल्याचे सत्तार म्हणाले. अर्थात त्यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली नाही, तर अन्य कुणाला मुख्यमंत्री करायचे हा सर्वस्वी पक्षप्रमुखांचा अधिकार आहे. ते जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. 

राष्ट्रपती राजवट हा महाराष्ट्राला लागलेला एक कंलक आहे, अशी भावना सर्व आमदारांची झाली आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत असतांना सरकार नसणे दुर्दैवी आहे. त्यामुळे राज्यात लवकर सक्षम आणि स्थिर सरकार यावे अशी सर्वसामान्य जनतेची देखील इच्छा आहे. येत्या काही दिवसांत ही इच्छा पुर्ण होईल असा विश्‍वास देखील सत्तार यांनी व्यक्त केला. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com