collector nakhate opend pak border door | Sarkarnama

रेश्‍मा खान यांचा मृतदेह आणण्यासाठी सोलापूरकर नकातेंनी उघडले पाक सीमेवरचे फाटक 

अक्षय गुंड 
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

रेश्‍मा खान यांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी चांगले काम माझ्या हातून झाले. याचे मला समाधान वाटले. 
शिवप्रसाद नकाते 
-जिल्हाधिकारी, बाडमेर (राजस्थान) 

उपळाई बुद्रुक (सोलापूर) : पाकिस्तानमध्ये मृत पावलेल्या भारतीय महिलेच्या कुटुंबासाठी बाडमेरचे (राजस्थान) जिल्हाधिकारी शिवप्रसाद नकाते जणू देवदूतच बनले आहेत. नकाते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील उपळाई बुद्रुकचे आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांनी 26 वर्षांनंतर भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील मुनाबाव -खोखरापार प्रवेशद्वार प्रथमच उघडून महिलेचा मृतदेह भारतात आणला. 

विशेष म्हणजे याच काळात जिल्हाधिकारी नकाते यांच्या पत्नी दवाखान्यात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या होत्या. त्यांच्यासोबत थांबणे आवश्‍यक असतानादेखील त्यांनी नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केला. राजस्थानातील बाडमेरच्या आगासडी येथील रेश्‍मा खान (वय 66) व मुलगा शायब खान हे दोघे 30 जूनला पाकिस्तानात छिपरा येथे नातेवाइकांना भेटायला गेले होते. रेश्‍मा यांचे 25 जुलैला तापाच्या आजाराने निधन झाले. आईचा दफनविधी मातृभूमीत व्हावा, अशी मुलगा शायबची व जादमची इच्छा होती. परंतु, 28 जुलै रोजी व्हिसा संपत असल्याने अनेक अडचणी समोर होत्या. 

रेश्‍मा खान यांचा मृतदेह 28 जुलै रोजी भारतात आणण्यासाठी जिल्हाधिकारी शिवप्रसाद नकाते यांनी वरिष्ठ पातळीवर संपर्क साधून भारतातून पाकिस्तानला आठवड्यातून एकदाच जाणारी थार एक्‍स्प्रेस एक तास खोखरापार स्थानकावर थांबवण्यासाठी 30 जुलैला पाकिस्तान सरकारने परवानगी दिली. जिल्हाधिकारी नकाते यांच्या अथक प्रयत्नाने मुनाबाव-खोखरापार प्रवेशद्वार प्रथमच उघडले आणि रेश्‍मा खान यांचा मृतदेह मायभूमीत आणला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख