औरंगाबाद दौऱ्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मराठवाड्याचा आढावा घेणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे९ आणि १० जानेवारी रोजी औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. प्रामुख्याने मराठवाडयातील महत्त्वपूर्ण समजला जाणारा नदीजोड, वॉटरग्रीड, विहिरीच्या योजना, पाणीपुरवठा आदी योजनांचा आढावा नव्याने घेतला जात आहे
Uddhav Thackeray to Take Review of Marathwada
Uddhav Thackeray to Take Review of Marathwada

औरंगाबाद : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊन राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांनी कारभार हाती घेतला, त्यानंतर पहिल्यादांच ते औरंगाबादेत येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मात्र दोन दिवसांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे संपुर्ण मराठवाड्यातील. कृषी, औद्योगिक, आरोग्य, सिंचन यासह अनेक महत्वाच्या प्रश्‍नांचा आढावा घेणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून स्वपक्षाच्या पदाधिकाऱ्यांना झुकते माप दिले जाणार असले तरी या निमित्ताने संपुर्ण मराठवाड्यातील सद्यस्थिती देखील मुख्यमंत्री जाणून घेणार आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत शिवसेनेची स्थापना केल्यानंतर त्यांना सर्वाधिक यश हे मराठवाड्यातच मिळाले. त्यामुळे या भागातील विकासाचा शिल्लक असलेला अनुशेष दूर करण्यासाठी उध्दव ठाकरे निश्‍चितच ठोस भूमिका घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री ९ आणि १० जानेवारी रोजी औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. प्रामुख्याने मराठवाडयातील महत्त्वपूर्ण समजला जाणारा नदीजोड, वॉटरग्रीड, विहिरीच्या योजना, पाणीपुरवठा आदी योजनांचा आढावा नव्याने घेतला जात आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या समान कार्यक्रमात उध्दव ठाकरे यांनी शिवभोजन योजना, एका रूपयात आरोग्य तपासणी आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती ही महत्वाच्या बाबींचा समावेश केला होता. यातील शेतकरी कर्जमाफी, शिवभोजन योजनेची घोषणा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन मंत्रीमंडळ अस्तित्वात येताच करण्यात आली होती. त्यामुळे या योजनांची काटेकोर अंमलबजावणीवर देखील उध्दव ठाकरे यांचा भर राहाणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाची तयारी याचा आढावा देखील घेतला जाणार आहे.

महापालिकेवर विशेष लक्ष?

राज्यात सत्ता असो की नसो, पण औरंगाबाद महापालिकेत गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेची सत्ता अबाधित आहे. परंतु गेल्या दीड दोन वर्षात कचरा, पाणी, रस्ते या मुलभूत प्रश्‍नांवर दुर्लक्ष झाल्याची भावना येथील नागरिकांची झाली होती. त्याचा फटका देखील शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत बसला. एप्रिल २०२० मध्ये महापालिकेची निवडणुक आहे. 

पंचवीस वर्षे शिवसेनेसोबत असलेली भाजप सत्तेतून बाहेर पडली असून शिवसेनेला कोंडीत पकडण्याची एकही संधी ते सोडत नाहीयेत. युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुर केलेली १६८० कोटीची शहराची पाणीपुरवठा योजना उध्दव ठाकरे यांनी स्थगित केल्याचे भांडवल भाजपकडून सध्या सुरू आहे.

या पार्श्‍वभूमीवर महापालिकेला अतिरिक्त निधीचा बुस्टर डोस देत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री हातभार लावतील अशी अपेक्षा आहे. महापालिकेच्या प्रश्‍नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी दोन तासांचा वेळ राखून ठेवला आहे यातच सगळे काही आले.

उद्योजकांना दिलासा देण्याची गरज

मसिआ उद्योजक संघटनेकडून याच दरम्यान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या या प्रदर्शनात मराठवाड्यातील उद्योग वाढीसाठी मुख्यमंत्री काही नवी घोषणा करतात का? याकडे देखील उद्योजकांचे लक्ष लागले आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठवाड्यातील अनेक महत्वाच्या शैक्षणिक संस्था, उद्योग विदर्भात पळवण्यात आले होते, त्याची भरपाई उध्दव ठाकरे करतील असे बोलले जाते.

विशेष म्हणजे फडणवीस सरकारमध्ये उद्योग खाते शिवसेनेकडेच होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील ते सुभाष देसाई यांनाच देण्यात आले आहे. त्याचा कितपत लाभ मराठवाड्याला होतो हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. एकंदरित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा मराठवाड्यासाठी किती फलदायी ठरतो हे पहावे लागेल.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com