cm uddhav thackary asked tehsildar to sit | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांनी तहसीलदाराला खुर्चीवर बसविले....स्वतः उभे राहिले!

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 19 जानेवारी 2020

....

पुणे :  इस्लामपूर येथील 14 कोटी रुपये खर्चुन उभारलेल्या नुतन तहसील कार्यालयाच्या इमारत उद्‌घाटन सोहळा नुकताच पार पडला. राजारामबापूंची दुर्मिळ छायाचित्रे असलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या वेळी उद्धव ठाकरे यांनी तहसीलदारांना खुर्चावर बसविले आणि स्वतः उभे राहिले. मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या या सौजन्याचे अनेकांनी कौतुक केले.

तहसील कार्यालयाविषयी ते म्हणाले, "" तहसील इमारत इतकी अद्यावत असू शकते याचे आश्‍चर्य आहे. देशात अशी इमारत नसेल. आता तिचा वापर कसा करणार हे जनतेच्या हातात आहे. सरकार येते-जाते, मात्र मालक असणारी जनता इथेच असते. अभिमान वाटेल अशी वास्तू ठेवा. आपल्या चांगल्या कारभारातून अधिकाऱ्यांनी जनतेचे आशिर्वाद मिळवावेत. याच जागी पुर्वी कडुनिंबाचे झाड होते. पंचक्रोशीतील जनतेला ते झाड जशी सावली देत होते तसेच सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम या पुढच्या काळातही अधिकाऱ्यांनी ताठ न वागता करावे.''

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, "" शेतकरी मर मर मरतो, कष्ट करतो पण तरीही त्याला दाम मिळत नसेल तर त्याने काय करावे? महापुराच्या त्सुनामीत आभाळ फाटले, घरे वाहून गेली. प्रचंड नुकसान झाले. सरकार तेव्हाही होते आणि आताही आहे. सरकारची पालकत्वाची भुमिका असते. राज्याचे जसे सरकार असते तसेच देशाचेही असते. केंद्र सरकार मात्र पालकत्वाची भुमिका पाळताना दिसत नाही. लोकसभेला शिवसेनेची भाजपशी युती होती. आमच्या मदतीने केंद्रात त्यांचे सरकार आले. राज्यात दुर्दैवाने युती तुटली. मात्र जनतेसाठी आम्ही मदत मागत असताना केंद्र सरकार जाणिवपुर्वक दुजाभाव करत आहे. कष्टाने हक्काने मिळवण्याची आमच्या मनगटात ताकद आहे. आम्ही ते मिळवू. देशाचा औद्योगिक चेहरा असणारे उद्योजक महाराष्ट्रात आहेत ही गौरवाची बाब आहे. त्यांना इतर राज्याकडून अमिषे दाखवली जातात. मात्र काहीच दिले जात नाही. महाराष्ट्रातील उद्योजकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागात जसा शेतकरी सुधारला पाहिजे तसचा शहरी भागात रोजगार निर्माण करण्यासाठी उद्योग वाढलेच पाहिजेत. शिकलेल्यांनी काय करायचे हा मोठा प्रश्‍न आहे. अर्थव्यवस्था कोमात गेल्याचे अर्थतज्ञ सांगत आहेत. हे कुणामुळे झाले ? असे असताना हातावर हात ठेवून बसायचे काय? त्याला बाहेर काढण्यासाठी हे सरकार मदत करेल. या आधीच्या सरकारने उद्योजकांशी अशी बैठकच घेतली नव्हती हे दुर्दैव आहे. ज्यांच्यावर रोजगार अवलंबून आहे त्या उद्योगाला मदत करण्याची आमची भुमिका आहे. उद्योग चालले तर शिक्षीत झालेल्या तरुणांच्या हाताला काम मिळेल. अलिकडे अनेक मुले बेरोजगार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसारखीच उद्योगांनाही चालना द्यायला हवी.''

कर्जमाफी विषयी ते म्हणाले, "" कर्जमाफीचा आम्ही दिलेला शब्द खरा करु. दोन लाखापर्यंत माफी आहेच; परंतू नियमीत कर्जदारांसह दोन लाखांच्यावर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देऊ. जे जास्त अडचणीत आहेत अगोदर त्यांना दिलासा देऊन मग इतर शेतकऱ्यांबाबत निर्णय घेऊ. ही फक्त घोषणा नाही, आमचा शब्द आहे.

जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, राजारामबापू बॅंकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, सभापती शुभांगी पाटील, कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, संग्राम पाटील, छायाताई पाटील, अविनाश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, तहसीलदार रविंद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी स्वागत केले. प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी आभार मानले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख