आधे इधर जाव, आधे उधर जाव, बाकी मेरे पिछे : मुख्यमंत्र्यांनी केले राष्ट्रवादीचे वर्णन

आधे इधर जाव, आधे उधर जाव, बाकी मेरे पिछे : मुख्यमंत्र्यांनी केले राष्ट्रवादीचे वर्णन

शिरपूर/ शहादा ता. 9 : ""निवडणुकीच्या आखाड्यात महायुतीचे पैलवान दंड थोपटत आहेत; पण समोरून लढायलाच कोणी नाही. कॉंग्रेसचे राहुल गांधी निवडणुकीपूर्वी पराभव मान्य करून बॅंकॉकला निघून गेले. राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था "आधे इधर जाव, आधे उधर जाव, बाकी मेरे पिछे आव' अशी आहे,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीची खिल्ली उडवली.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर, नेर आणि नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे त्यांच्या सभा झाल्या. शिरपूर येथील भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार काशीराम पावरा यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. या सभेत माजी शिक्षणमंत्री अमरीश पटेल, धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी दहिते, माजी अध्यक्षा संगीता देसले, राजेंद्र देसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले.

फडणवीस म्हणाले, की आघाडीचा जाहीरनामा त्यांची पराभूत मानसिकता दाखवणारा आहे. आपली सत्ता येणार नाही हे उमगल्याने अशक्‍यप्राय आश्वासने त्यांनी दिली आहेत. प्रत्येकाला ताजमहाल बांधून देऊ असे आश्वासन द्यायचेच शिल्लक ठेवले आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यात शेतकऱ्यांना 50 हजार कोटी रुपयांची मदत दिली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 30 हजार किलोमीटरचे रस्ते, दहा हजार किलोमीटरचे राज्य महामार्ग, तर 20 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग झाले. देशाच्या 25 टक्के रोजगारनिर्मिती महाराष्ट्रात झाली आहे, असा दावा त्यांनी केला.

सर्व उपसा योजना पाच वर्षांत
शहादा : शेतकऱ्यांच्या शेतात गेल्या पंधरा वर्षांत पाणी गेले नाही. कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केला. पाच वर्षांत तापी काठावरील बॅरेजेसच्या माध्यमातून उपसा सिंचन योजना सुरू करतोय. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाईल, ते सुजलाम्‌- सुफलाम्‌ होतील. नर्मदा-तापी नदीजोड प्रकल्प करून त्यातील दहा टीएमसी पाणी याच मतदारसंघासाठी आणले जाईल. त्याचा फायदा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळेल, असे फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, की उकाईच्या बॅक वॉटरमधून पाच टीएमसी पाणी आणण्याचे नियोजन आहे. राज्यातील 19 हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेची कामे केली आहेत. 2021-22 पर्यंत राज्यात एकही बेघर राहणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com