cm repeats hindi speech in marathi : Sule | Sarkarnama

मुख्यमंत्री हिंदीतली भाषणं मराठीत करतात : सुप्रिया सुळे

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

मुंबई : केंद्रातील भाजपचे नेते हिंदीत जी भाषणं करतात तीच भाषणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठीतून करत आहेत, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. "साम' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

मुंबई : केंद्रातील भाजपचे नेते हिंदीत जी भाषणं करतात तीच भाषणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठीतून करत आहेत, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. "साम' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

सध्या महाराष्ट्राची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्रातल्या जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांना महत्त्व असायला हवं. फडणवीस सरकारने गेल्या पाच वर्षांत काय केले हे त्यांनी भाषणात सांगायला हवं. पण ते केवळ भारत पाकिस्तान, 370 कलम यांसारख्या भावनिक मुद्‌द्‌यावरच भाषणं करत आहेत. ही सगळी भाषणं दिल्लीतले भाजपचे नेते हिंदीतून करतात, अशी टीका त्यांनी केली.

सतत याच विषयावर त्यांची भाषणं बेतलेली असतात. त्यांचीच हिंदीतली भाषणं फडणवीस मराठीतून भाषांतरीत करून महाराष्ट्रातल्या जनतेसमोर करत असल्याची टीका सुळे यांनी केली.

पाच वर्षांत बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. रस्ते खड्‌डेमुक्‍त झालेले नाहीत. उद्‌योग बंद पडत आहेत. अनेक भागात दुष्काळाचे तर काही भागात महापुराचे संकट आहे. जनता सर्वबाजूने त्रस्त असताना फडणवीस सरकारने त्यावर केलेल्या उपाययोजना सांगायला हव्यात. पण, ते या सर्व प्रश्‍नांची सोडवणूक करताना अपयशी झाले असल्याने त्यांना अशाप्रकारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विषयांचा प्रचारात आधार घ्यावा लागतो आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रधर्माचाच विसर पडला हे अनाकलनीय असून, राष्ट्रीय प्रश्‍नावर बोलण्यासाठी संसद आहे. लोकसभेची निवडणूक त्यावरच झालेली आहे. मग आता महाराष्ट्राच्या निवडणुकीत सतत 370 कलमाचाच वापर होणार असेल, तर हा राज्यातल्या जनतेची दिशाभूल करणारा प्रचार आहे, अशी टीका सुळे यांनी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख