cm public meeting cancell in sangli | Sarkarnama

मराठा आंदोलनामुळे सांगलीतील मुख्यमंत्र्यांची सभा रद्द 

जयसिंग कुंभार 
सोमवार, 30 जुलै 2018

सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार आज सायंकाळी समाप्त झाला. आता मंगळवारी (ता. 1) 78 जागांसाठी मतदान होईल. चार लाख 23 हजार मतदारांच्या हाती या उमेदवारांचे भवितव्य असेल. 

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार आज सायंकाळी समाप्त झाला. आता मंगळवारी (ता. 1) 78 जागांसाठी मतदान होईल. चार लाख 23 हजार मतदारांच्या हाती या उमेदवारांचे भवितव्य असेल. 

पाच जागांचा अपवाद वगळता कॉंग्रेस-राष्ट्रवादीची 72 जागांवर आघाडी झाली असून, भाजपने सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तथापि, अनेक प्रभागांत शिवसेना, जिल्हा सुधार समिती आणि अपक्ष उमेदवारांचेही आव्हान असेल. मराठा आंदोलनाची ठिणगी प्रचार काळात येथे पडली नाही, मात्र या आंदोलनाची छाया प्रचारावर जाणवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगली दौरा आंदोलकांच्या इशाऱ्यामुळे रद्द झाला. अर्थात, अखेरपर्यंत प्रचार थंडच राहिला. 

विद्यमान सभागृहात कॉंग्रेसचे 45 नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत, तर विरोधी पक्ष असलेल्या "राष्ट्रवादी'चे 25 जागांचे बळ आहे. गेली पाच वर्षे सत्ताधारी आणि विरोधक (कागदावर तरी) असलेल्या दोन्ही कॉंग्रेस एकत्र आल्या आहेत. याचे कारण सध्या राज्य आणि देशात भाजपविरोधकांची सुरू असलेली एकजूट हेही यामागचे कारण आहे. 

विशेषतः "राष्ट्रवादी'चे प्रदेश अध्यक्ष झाल्यावर जयंत पाटील यांनी पुढाकार घेऊन ही आघाडी केली. माजी मंत्री मदन पाटील आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांची कमतरता कॉंग्रेसला खूप जाणवली. दोन्ही कॉंग्रेकडून प्रचारात फारशी अशी आक्रमकता नव्हती. भाजपची प्रचार यंत्रणा अधिक सुसज्ज असली, तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. भाजपचे काही उमेदवार आयातच असले, तरी स्वबळावर लढण्याचे धाडस दाखवले आहे. थेट शून्यावरून शिखरावर जायचा विडाच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उचलला आहे. खासदार संजय पाटील यांची या निवडणुकीतील सक्रियता फार उत्साहाची दिसली नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख