cm praises vadar samaj | Sarkarnama

वडार समाजाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्र्यांची हनुमान उडी

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 17 डिसेंबर 2018

सोलापूर : राज्यस्तरीय मेळाव्यास उपस्थित राहिलेल्या लाखो वडार समाज बांधवांच्या साह्याने आगामी काळात आम्ही निश्चितच हनुमान उडी टाकणार आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. वडार समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

सोलापूर : राज्यस्तरीय मेळाव्यास उपस्थित राहिलेल्या लाखो वडार समाज बांधवांच्या साह्याने आगामी काळात आम्ही निश्चितच हनुमान उडी टाकणार आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. वडार समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

मी वडार महाराष्ट्राचा या संस्थेच्या वतीने सोलापुरात आयोजिलेल्या राज्यस्तरीय मेळाव्यात श्री. फडणवीस बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, संस्थेचे अध्यक्ष विजय चौगुले व्यासपीठावर होते. संपूर्ण राज्यभरातून लाखो समाजबांधव या मेळाव्यास उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरवात वडार भाषेने केली. जय बजरंग..जय वडारची घोषणा करीत श्री. फडणवीस यांनी वडार समाजाप्रती आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, वडार समाजाचा हात लागल्याशिवाय श्री विठ्ठलाचा रथही पुढे जात नाही. मग त्यांच्या मदतीशिवाय माझ्या महाराष्ट्राचा रथ कसा पुढे जाईल. विश्वकर्म्याचे काम वडार समाजाने केले आहे. निर्मितीचे काम त्यांनी केले आहे. आम्ही उंचच उंच इमारती, देवळे, मंदीरे पाहिले. त्यांचे कळस पाहिले, पण त्याचा पाया या माझ्या वडार बांधवांनी रचला आहे. ज्या समाजाने स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या स्वातंत्र्यात मोठे योगदान दिले, ते समाज आज हलाखी जीवन जगत आहेत. ज्यांनी आम्हाला घर दिले, त्यांनाही आम्ही पक्की घरे देणार.

वडार समाजाला आरक्षण देण्यासाठी विधाते समितीने सकारात्मक अहवाल दिला आहे. हा अहवाल निती आयोगाकडे नेऊन, प्रसंगी पंतप्रधानांशी बोलू. वडार समाजाच्या मागणीनुसार त्यांना अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलण्यात येतील. महामंडळाची स्थापना करण्यासाठी 100 कोटींची तरतूद करू, त्यासाठी सबप्लॅन करण्यात येईल. वडार समाजाच्या ज्या वस्त्या आहेत, त्या वस्त्यांमधील जागा त्यांच्या मालकीच्या करण्यात येतील. त्यांच्या मालकीचा पट्टा देण्यात येईल. बांधकाम कामगार नोंदणी सुरु आहे. पंतप्रधान योजनेंतर्गत अडीच लाख रुपये आणि बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनेंतर्गत दोन लाख असे एकूण चार लाख रुपयांचे अनुदान त्यांना देण्यात येईल. आजच्या मेळाव्यात महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने आलेला वडार समाज पाठीशी आहे. त्यांच्या सहकार्याने आगामी काळात आम्ही निश्चित हनुमान उडी मारू आणि याच मैदानावर येऊन सत्कार स्वीकारू, असेही श्री. फडणवीस म्हणाले. यावेळी श्री. आठवले व श्री. शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.

चौगुलेंना राज्यमंत्र्यांचा दर्जा

या मेळाव्याचे संयोजक व मी वडार महाराष्ट्राचा या संस्थेचे संस्थापक विजय चौगुले यांची  वडार समाज राज्यव्यापी समन्वय समितीच्या प्रमुखपदी नियुक्त केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्याचवेळी या पदाला राज्यमंत्री दर्जा दिल्याचेही ते म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख