Cm Praises Ram Bhadane's Work in Dhule Rural | Sarkarnama

धुळे ग्रामीण मतदारसंघात भाजपच्या राम भदाणेंचा धडाका

निखिल सूर्यवंशी
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस 22 ऑगस्टला जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी स्वागत स्वीकारत नगाव ही कार्यसम्राट दिवंगत माजी आमदार द. वा. पाटील यांची पावन भूमी असल्याचे सांगत त्यांचे नातू "भाजयुमो'चे जिल्हाध्यक्ष राम भदाणे आणि मला जनतेने आशीर्वाद द्यावा, पुन्हा भाजपच्या हाती सत्ता द्यावी,'' असे आवाहन केले होते.

धुळे : विधानसभा निवडणुकीची प्रतीक्षा असताना मुख्यमंत्र्यांसह धुळे ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे युवा नेते राम भदाणे यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी पक्षाच्या विजयासाठी लोकसभा निवडणुकीपासूनच कंबर कसली. प्रचाराचा धडका लावतानाच त्यांनी सभांमधून भाजपची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत रुजविण्याचा विडा उचलला. त्यांच्या कार्याची माहिती जाणून घेतल्यावर प्रभावित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही "माझ्यासह राम भदाणे यांना जनतेने आशीर्वाद द्यावे'', असे आवाहन केल्याने भदाणेंसह कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला आहे.

महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस 22 ऑगस्टला जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी स्वागत स्वीकारत नगाव ही कार्यसम्राट दिवंगत माजी आमदार द. वा. पाटील यांची पावन भूमी असल्याचे सांगत त्यांचे नातू "भाजयुमो'चे जिल्हाध्यक्ष राम भदाणे आणि मला जनतेने आशीर्वाद द्यावा, पुन्हा भाजपच्या हाती सत्ता द्यावी,'' असे आवाहन केले होते. यातून मुख्यमंत्र्यांनी पक्षासह भदाणे व समर्थक कार्यकर्त्यांचा हुरूप वाढविल्याने  भदाणे यांच्याकडे सर्वांच्या नजरा वळल्या.

लोकसभा निवडणुकीत उमेदवार तथा नवनिर्वाचीत खासदार डॉ. सुभाष भामरे यांना धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात अधिकाधिक मताधिक्‍य मिळावे म्हणून भदाणे यांनी इतर नेते, पदाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचाराची धुरा सांभाळली होती. विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम मानून प्रचाराचा धडका लावला आणि जनसंपर्क घट्ट करण्याचा प्रयत्न केला. युवा नेतृत्वामुळे त्यांना चांगला पाठिंबाही मिळत गेला. यानंतर भदाणे यांच्या नेतृत्वात विविध गावांमधील इतर पक्षांचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. 

भाजपला विजय मिळावा आणि मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावे म्हणून भदाणे यांनी गावोगावी प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे विद्यमान आमदार कुणाल पाटील यांच्यापुढे भदाणे यांनी आव्हान निर्माण केले आहे. आजोबा माजी आमदार, वडील मनोहर भदाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, आई ज्ञानज्योती भदाणे या धुळे पंचायत समितीच्या माजी सभापती, नगावच्या सरपंच, असा समृद्ध राजकीय वारसा राम भदाणे यांच्या पाठीशी असल्याने त्यांनी अल्पावधीत कार्याचा वेगळा ठसा धुळे ग्रामीण मतदारसंघात उमटवला आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख