cm phadnis | Sarkarnama

विचित्र मागण्यांमुळे मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी त्रस्त

तुषार खरात
रविवार, 23 एप्रिल 2017

मुंबई : "मुख्यमंत्री म्हणजे जणू काही साक्षात ब्रह्मदेवाचा अवतार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे काहीही मागितले तरी ते आपल्याला सहज मिळेल' अशा थाटात अनेकजण मुख्यमंत्री कार्यालयात विचित्र मागण्या घेऊन येत आहेत. अशा 'अतरंगी' लोकांची समजूत काढताना मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी व अधिका-यांच्या नाकीनऊ येत आहे. 

मुंबई : "मुख्यमंत्री म्हणजे जणू काही साक्षात ब्रह्मदेवाचा अवतार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे काहीही मागितले तरी ते आपल्याला सहज मिळेल' अशा थाटात अनेकजण मुख्यमंत्री कार्यालयात विचित्र मागण्या घेऊन येत आहेत. अशा 'अतरंगी' लोकांची समजूत काढताना मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी व अधिका-यांच्या नाकीनऊ येत आहे. 

उमरखेड येथील एक महिला "मला नगराध्यक्ष करा' ही मागणी घेऊन काही महिन्यांपासून मुख्यमंत्री कार्यालयात खेटे घालत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही ती वारंवार भेटत आहे. मुख्यमंत्र्यांकडूनच आपले काम होऊ शकते, अशी तिची ठाम समजूत झाल्याने ती मोठ्या चिकाटीने मुख्यमंत्री कार्यालयात येत असते. एकदा मुख्यमंत्र्यांनी तिला वेळ देऊन तिचे म्हणणेही ऐकून घेतल्याचे एका अधिका-याने "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

घरांची मागणीसाठी येणा-यांची संख्या फार मोठी आहे. तलाठी, ग्रामसेवक, सरपंच यांच्याविरोधातील तक्रारी करीत ताबडतोब कारवाईचा हट्ट करणारे अनेकजण असतात. मी 30 वर्षे पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मला एखादे महत्त्वाचे पद द्या. मला महामंडळाचे अध्यक्ष बनवा. अशा नानाविध मागण्या, समस्या, तक्रारी घेऊन ही मंडळी मुख्यमंत्री कार्यालयात येत असतात. दररोज शेकडो संख्येने लोक येतात. त्यातील शंभरजण तरी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा हट्ट धरून बसतात. यातील 90 टक्के लोकांचे प्रश्न खालच्या स्तरावर सुटण्यासारखे असतात.

तहसीलदार, तालुका कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय, विविध जिल्हा कार्यालये, आयुक्तालय / संचालनालय, मंत्रालयातील संबंधित खात्यातील उपसचिव, सचिव, मंत्री या स्तरावर सुटतील अशा बहुतांश मागण्या असतात. पण बरेचजण हे सगळे प्रयत्न न करता थेट मुख्यमंत्र्यांकडे येतात.

काहीजणांची प्रकरणे तकलादू, गुंतागुंतीची व काही न सुटणारी असतात. पण मोठ्या चिकाटीने आपले विषय घेऊन लोक मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करतात. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारीही हे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने मदत करतात. पण मुख्यमंत्र्यांनाच भेटण्याची त्यांना हौस असते. मुख्यमंत्र्यांनी फक्त 'खाली' एक फोन केला की माझे काम होऊन जाईल, असा हट्ट धरून बसतात. अशा लोकांना समजावून सांगणे, आता जिकिरीचे झाले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख