cm phadnis | Sarkarnama

भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात फडणवीसांचा बोलबाला

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभा घ्यायच्या की नाही, यावर निवडणुकीआधी भाजप प्रदेश कार्यकारिणीमध्ये दिवसाआड विचार होत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचाराची जबाबदारी स्वतः:च्या खांद्यावर घेतल्यामुळे मोदींना निवडणूक प्रचारात न उतरविण्याबाबत कार्यकारिणीमध्ये एकमत झाले होते,अशी माहिती भाजपच्या सूत्रांकडून देण्यात आली. स्थानिक पातळीवरील प्रश्‍न, संघटनात्मक बांधणी करत, त्या त्या महापालिका कार्यक्षेत्रातील प्रभावशाली भाजपचे लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. 

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये मुंबईसह राज्यात भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाचा संदर्भ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशाच्या प्रचारसभेतही केला आहे. राज्यातील भाजपच्या निवडणुकीची सूत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः:च्या खांद्यावर घेतल्याने त्यांचे राष्ट्रीय पातळीवर वजन वाढले आहे.

सेनेने युती तोडल्याने अटीतटीच्या या लढतीत महाराष्ट्रात नरेंद्र मोदींना प्रचारात आणण्याचा विचार झाला होता. यशापयशाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली असल्याने जनमताचा कौल भाजपच्या विरोधात गेला असता तर मुख्यमंत्री बॅकफुटवर गेले असते. परंतु भाजपच्या विजयामुळे भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात फडणवीस यांचा बोलबाला झाला असल्याचे भाजप वर्तुळात बोलले जाते. 

राज्यातील नुकत्याच पार पडलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने युती तोडल्यानंतर, भाजपला कोणत्याही परिस्थिती यश मिळवून देण्याचे उत्तरदायित्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावे लागणार होते. शिवसेनेने नोटाबंदीसारखे राष्ट्रीय मुद्दे उपस्थित करुन भाजपच्या विरोधात प्रचाराचा रोख ठेवला होता. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभा घ्यायच्या की नाही, यावर निवडणुकीआधी भाजप प्रदेश कार्यकारिणीमध्ये दिवसाआड विचार होत होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचाराची जबाबदारी स्वतः:च्या खांद्यावर घेतल्यामुळे मोदींना निवडणूक प्रचारात न उतरविण्याबाबत कार्यकारिणीमध्ये एकमत झाले होते,अशी माहिती भाजपच्या सूत्रांकडून देण्यात आली. स्थानिक पातळीवरील प्रश्‍न, संघटनात्मक बांधणी करत, त्या त्या महापालिका कार्यक्षेत्रातील प्रभावशाली भाजपचे लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. ग्रामीण तसेच शहरातील निवडणुकीचा रिमोट कंट्रोल जणू मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हातात ठेवला होता. त्यामुळे मिळालेल्या यशानंतर मॅन ऑफ द मॅच चा किताब मुख्यमंत्र्यांच्या शिरपेचात लावला गेला आहे. 
राज्यात पंचायत ते पार्लमेंट भाजप नंबर. 1 असा जयघोष करत शनिवारी नरिमन पॉंईट येथील भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच भाजपच्या कार्यकर्त्याचे हिरो ठरले आहे. जनतेच्या विश्‍वासाच्या लाटेवर राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. सर्व समाजातील लोकांच्या पाठिंब्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातही भाजप नंबर वन ठरला आहे, असा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यकर्त्यांच्या जल्लोष कार्यक्रमात बोलताना सांगितले.

राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार करत आहे. गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामांची पोचपोवती म्हणून जनतेने भाजपला यशाचा कौल दिला आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख