CM Met Congress Leaders in Mumbai | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांनी घेतल्या कॉंग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 जून 2019

विधानसभेत भाजपला कुठलीही रिस्क घ्यायची नाही. मुख्यमंत्र्यांना शहरात पुन्हा षट्‌कार मारून आपली ताकद दाखवून द्यायची आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधील काही ताकदीच्या व सक्रिय पदाधिकाऱ्यांशी ते संपर्क साधत आहेत. नागपूरमध्ये काही उमेदवार बदलण्याच्याही हालचाली भाजपमध्ये सुरू आहेत. यापैकी एखाद दुसऱ्या मतदारसंघात उमेदवारी देऊन कॉंग्रेसच्या उमेदवाराचे समाधान करण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

नागपूर : लोकसभेतील दारुण पराभवानंतर कॉंग्रेसचे आणखी खच्चीकरण करण्यासाठी अनेक नेत्यांना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आणण्याच्या हालचाली मुख्यमंत्र्यांनी सुरू केल्या आहेत. यात नागपूरचाही समावेश असून, शुक्रवारी मुंबईत काही नेत्यांसोबत त्यांनी चर्चा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

नागपूर शहरात कॉंग्रेसचा एकही आमदार नाही. दीडशे सदस्यांच्या महापालिकेत फक्त 18 नगरसेवक आहेत. असे असतानाही कॉंग्रेसची पाळेमुळे भक्कम आहेत. लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी साडेचार लाख मते घेऊन ते दाखवून दिले. नितीन गडकरी यांच्यासारखा दिग्गज उमेदवार विरोधात असतानाही कॉंग्रेसला साडेचार लाख मते मिळाही. एवढेच नव्हे, तर त्यांचे मताधिक्‍य कमी केले.

त्यामुळे विधानसभेत भाजपला कुठलीही रिस्क घ्यायची नाही. मुख्यमंत्र्यांना शहरात पुन्हा षट्‌कार मारून आपली ताकद दाखवून द्यायची आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधील काही ताकदीच्या व सक्रिय पदाधिकाऱ्यांशी ते संपर्क साधत आहेत. नागपूरमध्ये काही उमेदवार बदलण्याच्याही हालचाली भाजपमध्ये सुरू आहेत. यापैकी एखाद दुसऱ्या मतदारसंघात उमेदवारी देऊन कॉंग्रेसच्या उमेदवाराचे समाधान करण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांना भाजपने पक्षात घेतले. सुजय विखे यांना निवडून आणून त्यांनी आपली ताकदही दाखवून दिली. त्यांचा मंत्रिमंडळातही समावेश केला. विखे पाटलांपासून जिल्ह्यातील काही बडे नेते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. पक्षात घेताना त्यांचे मेरिट तसेच त्यांची उपयोगिताही तपासली जात आहे. त्यामुळे घाई करण्याऐवजी विधानसभेच्या तोंडावर कॉंग्रेसमध्ये मोठी फूट पाडण्याचा विचार केला जात असल्याचेही बोलले जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख