cm mahrashtra | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

तुरीबाबत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 एप्रिल 2017

औरंगाबाद : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुरीच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण करण्याचे आवाहन करत शेतकऱ्यांना तूर पेरण्याचे आवाहन केले होते. तुरीचे जेवढे उत्पादन होईल ती सगळी तूर चांगल्या दराने खरेदी करण्याचे आश्‍वासन देखील देण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मराठवाडा व राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीचे पीक घेतले. मात्र आता सरकारने तूर खरेदी बंद करत शेतकऱ्यांच्या पाठीत नव्हे तर पोटात सुरा खुपसला आहे. या सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात 420 कलमाखाली फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारा तक्रार अर्ज अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीने पैठण पोलिस ठाण्यात देण्यात आला आहे. 

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर देशातील शेतकऱ्यांनी तुरीचे प्रचंड उत्पादन घेत देशाला स्वयंपूर्ण केले. पण जेव्हा तूर खरेदी करण्याची वेळ आली तर या सरकारने हात वर करत शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप अन्नदाता शेतकरी संघटनेने केला आहे. राज्यात लाखो क्विंटल तूर पडून आहे, आणि सरकार म्हणते 22 एप्रिल पर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचीच तूर खरेदी केली जाईल. मग इतर शेतकऱ्यांनी काय करायचे. या सरकारने शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला आहे. याला राज्यकर्ते म्हणून मुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि सहकार व पणनमंत्री जबाबदार असून त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी आग्रही मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने पैठण पोलिसांकडे एका तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे. 
गुन्हा दाखल करा 
शेतकऱ्यांचा या सरकारने विश्‍वासघात केला आहे, तूर पेरायला लावून हमी भावाने खरेदीचे आश्‍वासन दिल्यावर ते न पाळणे ही एक प्रकारची फसवणूकच आहे. त्यामुळे यासाठी जो 420 चा गुन्हा दाखल केला जातो तो मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्र्यांविरोधात व्हायला हवा अशी मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जयाजी सूर्यवंशी यांनी केली आहे. पैठण पोलिस ठाण्यात आम्ही तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्याचे काम करावे. पण सरकार आणि गृहखाते मुख्यमंत्र्यांकडेच असल्यामुळे पोलिस गुन्हा दाखल करतील की नाही याबाबत आम्ही साशंक आहोत अशीही शंका त्यांनी व्यक्त केली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख