मुख्यमंत्री साहेब, आज मला न्याय मिळाला..! लोकशाही दिनातील उत्स्फूर्त प्रतिक्रिया

मुख्यमंत्री साहेब, आज मला न्याय मिळाला..! लोकशाही दिनातील उत्स्फूर्त प्रतिक्रिया

मुंबई : मंत्रालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या ऑनलाईन लोकशाही दिनात राज्यातील सामान्य नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत त्यावर तातडीने मार्ग काढला जातो. असाच अनुभव आज झालेल्या लोकशाही दिनात सोलापूरच्या चनबसप्पा घोंगडे यांना आला.

त्यांच्या तक्रारीवर कार्यवाही झाल्यानंतर त्यांच्या तोंडून "मुख्यमंत्री साहेब आज मला आपल्याकडून न्याय मिळाला..खाली न्याय मिळण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे", अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकशाही दिनात आज 12 जणांच्या तक्रारींची दाखल घेऊन त्यावर सुनावणी करण्यात आली. त्यावेळी श्री. घोंगडे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
 
घोंगडे यांची लोहारा जिल्हा उस्मानाबाद येथे जमीन आहे. त्यांच्या मालकीच्या जमिनीवर बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉटची नोंद झाल्याबाबत त्यांनी तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात केलेल्या कारवाईबाबत महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी माहिती देताना सांगितले की  या प्रकरणी केलेल्या चौकशीत तथ्य आढल्याने फेरफार रद्द करण्यात आले. त्यामुळे गाव नमुन्यावर चुकीच्या नोंदी घेणाऱ्या ग्रामसेवक व उपसरपंचा विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे, आपल्या तक्रारीवर झालेली कार्यवाही ऐकून श्री. घोंगडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. तालुकास्तरावरच न्याय मिळाल्यास चांगले होईल अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून व्यक्त केली. 

वांद्रे येथील श्रीमती शिलू ननवाणी यांनी घराजवळील नाल्यावर बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाचा त्रास होत असल्याबाबत तक्रार केली होती. यावर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या मार्फत स्थळ पाहणी करावी व त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. 

कुसुंबा जिल्हा धुळे येथील ट्रॉमा केअरचे काम मार्गी लागले असून जागे अभावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी त्याचे काम सुरू करण्यात येईल,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या ट्रॉमा केअरच्या कामाबाबत गणेश सूर्यवंशी यांनी तक्रार दाखल केली होती. 

आज झालेल्या लोकशाही दिनात लातूर, नांदेड, पालघर, वाशीम, सिंधुदुर्ग, धुळे, रायगड, जळगाव येथील नागरीकांच्या तक्रारींवर सुनावणी करण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मनीषा म्हैसकर आदी अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या लोकशाही दिनात आतापर्यंत ११४८ तक्रारी मिळाल्या होत्या. त्यातील ११४७ तक्रारींचा निपटारा झाल्याचा दावा मुख्यमंत्री कार्य़ालयाने केला आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com