मुख्यमंत्र्यांचा पोलिसांवर कसलाही वचक नाही - जयंत पाटील 

फडणवीसांनी रोजगाराची आकडेवारी जाहीर करावी, असे आवाहन करत आमदार जयंत पाटील यांनीसध्या कोंबडीपेक्षा अंडे महागले असल्याची टीका केली. ते म्हणाले, "शेतीमालाचे दर पडल्याने शेतकऱ्यांना कसलाच दिलासा नाही. असंघटित वर्गाचा रोजगार कमी झाला. त्यामुळे दारिद्रय वाढले. बेकारी वाढली. मेक इन इंडियात रोजगार मिळाला नाही. उशिरा का होईना फडणवीसांनी आमच्या मागण्यांची दखल घ्यावी. आम्ही कर्जमाफी घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही."
Jayant-Patil
Jayant-Patil

इस्लामपूर : " चंद्रकांत पाटील हुशार मंत्री आहेत. बैठक घेऊन त्यांनी खड्डे भरण्यासाठी जे डांबर दिले आहे, त्यातील निम्मे पैसे वापरा आणि निम्मे मीडिया मॅनेज करायला घालायला सांगितले. लोकांची दिशाभूल करणारे हे सरकार आपल्या हिताचे नाही. दारूच्या बाटलीला महिलांचे नाव देण्याची गिरीश महाजन यांची सूचना बेमुवर्तखोरपणाची आहे,"  अशी टीका  माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांनी येथे केली . 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारमधील मंत्र्यांवर माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी शेलक्या शब्दात टीकाटिप्पणी करीत झोडपून काढले.

शेतकरी हिताच्या व सर्वसामान्य जनतेच्या विरोधातील हे सरकार निर्लज्ज असल्याचा आरोप त्यांनी आज इस्लामपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्च्यात केला.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्यासह वाळवा तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप सरकार चले जाव, कर्जमुक्ती झालीच पाहिजे, महिलांवरील अत्याचार थांबलेच पाहिजेत यासह अन्य घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

आमदार जयंत पाटील म्हणाले, "सरकारच्या एकूण धोरणाविषयी शंका आहे. खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सामान्य माणसाला अडचणीच्या खाईत लोटले आहे."

"तीन वर्षात टप्प्याटप्प्याने विजेचे दर वाढवण्याचे पत्रक दिलेय. शेतकरी शेतीमालाला किंमत नाही. तूरडाळ, सोयाबीनला आधारभूत किंमत नाही. गरज नसताना शेतीमाल आयात केला. आधी सिलेंडर वाटून मग बहाद्दर मोदींनी गॅसचे दर वाढवले."

"नोटबंदीनंतर नोटा बदलून घेण्याची गरज कोणत्याही श्रीमंताला पडली नाही, पैसे घरपोच केले गेले. रांगेत सामान्य होरपळले. आमच्या सरकारने एक लाख ९० हजार कोटी काळा पैसा पकडला. यांनी फक्त एक लाख १० हजार कोटी पकडले. धनगर, मराठा, मुस्लिम समाज आरक्षणात सरकार अपयशी ठरले आहे."

ते म्हणाले, "उद्धव ठाकरे सत्तेत भागीदार आहेत. कोणताही निर्णय यांनी मान डोलावल्याशिवाय होत नाही आणि यांना त्याला विरोध केल्याशिवाय यांना करमत नाही. लोकांसाठी राजकारण करत असाल तर आधी सत्तेतून तुम्ही खाली उतरा. तुम्ही उतरल्यावर आम्ही तिथे जाऊ अशी शंका तुमच्या मनात आहे पण आमच्या मनात तसले पाप नाही. "

" मुख्यमंत्र्यांचा पोलिसांवर कसलाही वचक नाही. जिल्हा दौऱ्यावर आल्यावर कोथळेच्या घरी भेट द्यायला पाहिजे होती, पण त्यांना गरज वाटत नाही. नरेंद्र मोदींना जाहिरातीला, सामान्य बाबींवर ट्विट करायला वेळ आहे, कोहलीच्या शतकानंतर अभिनंदन करायला वेळ आहे; पण गौरी लंकेश हत्येनंतर मत मांडायला वेळ नाही. यावरून सरकारची दानत ओळखावी."

माजी मंत्री अण्णासाहेब डांगे म्हणाले, "सरकारने देशातील शेतकऱ्यांची वाट लावली. महिलांवरील अत्याचार वाढले, शेतकरी आत्महत्या वाढल्या. कुणी सुखी नाही. जनजीवन उध्वस्त झाले आहे. परिणामी हल्लाबोल मोर्चे काढावे लागले. 'बस्स झाले, घरी जावा' म्हणायची वेळ आलीय. मेक इन इंडिया भूल आहे. ३७ सूतगिरण्या बंद आहेत. शेतकरी, सभासदांची वाट लागलीय. सरकार राज्य करण्याच्या लायकीचे नाही. आजचा पहिला धक्का आहे. हे सरकार घालवायचे आहे. यांना सत्ता सोडायला भाग पाडू." 

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, संग्राम पाटील, महिला अध्यक्ष सुश्मिता जाधव, रोझा किणीकर, पूनम सावंत, सभापती सचिन हुलवान, ब्रह्मानंद पाटील, छाया पाटील, विशाल सूर्यवंशी यांची भाषणे झाली. बी. के. पाटील, बाळासाहेब पाटील, प्रा. शामराव पाटील, संजय पाटील, विष्णूपंत शिंदे, विजयभाऊ पाटील, सुभाष सूर्यवंशी, रवींद्र बर्डे, विनायकराव पाटील, देवराज पाटील, धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com