मावळ आणि शिरूरचे खासदार मोदींना पाठिंबा देणारे असणार : मुख्यमंत्र्यांची शिवसेनेला गुगली

मावळ आणि शिरूरचे खासदार मोदींना पाठिंबा देणारे असणार : मुख्यमंत्र्यांची शिवसेनेला गुगली

पिंपरी : नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मावळ व शिरूरमध्ये भाजपचा खासदार निवडून द्यायचा अटल संकल्प करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आज पिंपरी-चिंचवडमध्ये केले. यातून त्यांनी या दोन्ही ठिकाणी खासदार असलेल्या शिवसेनेला थेट इशाराच दिला.

अटल संकल्प महासंमेलनात भाजपनेही आता स्बबळाचा नारा दिला. शिवसेनेच्या वरील दोन्ही जागांवर पक्षाचे खासदार करण्याचा अटल संकल्पही यावेळी सोडण्यात आला. परिणामी अगोदरच भाजपवर विखारी टीका करणाऱ्या शिवसेनेकडून आता भाजपच्या या जोरदार उत्तरावर तसेच प्रत्युत्तर येण्याची दाट शक्‍यता आहे. 

राज्यातील लोकसभा निवडणूक तयारीची भाजपची पहिली सभा तथा अटल संकल्प महासंमेलन आज पिंपरी-चिंचवडमध्ये झाले.यावेळी आतापर्यंत युतीसाठी बचावाच्या पावित्र्यात असलेला भाजप प्रथमच आक्रमक दिसला. शिवसेनेचे खासदार असलेल्या मावळ व शिरूरमध्येच त्यांनी पक्षाचे खासदार निवडून आणण्याचा संकल्प केला. सभेतील सर्वच वक्‍त्यांच्या भाषणात स्वबळाची भाषा व शिवसेनेला दिलेला इशारा दिसला. राज्य व केंद्रात सत्तेत येण्याचे दोन्ही कॉंग्रेसचे स्वप्न साकार होणार नाही हे सांगताना ते त्यांचे मुंगेरीलाल के हसीन सपनेच राहील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

शिवसेनेचे खासदार असलेल्या मावळ व शिरूरमध्ये सभा घेतली म्हणजे युती संपली का असेही नाही, असे इशारा देतानाच शिवसेनेला मुख्यमंत्र्यांनी चुचकारेलही.त्याचवेळी या दोन्ही मतदारसंघात मोदींना जे पाठिंबा देतील, तेच निवडून येतील, असे शिवसेनेला सुनावण्यास त्यांनी कमी केले नाही. ही सभा कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही वा कुणाला आमची ताकद दाखवून देण्यासाठीही नाही. कारण ती अगोदरच दाखवून दिली आहे,या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी स्वबळाचे संकेत दिले. मोदींना पंतप्रधान करणे ही भाजपची नाही, तर देशाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही शिवसेनेचे खासदार असलेल्या मावळ व शिरूरमध्ये भाजपचा विजय होईल, अशी भविष्यवाणी करीत स्वबळाचीच भाषा केली. पुणे जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी,तर शिवसेनेची संभावना शेखचिल्ली अशी केली. युतीच्या फांदीवर बसलेली शिवसेना ही फांदीच कापायला निघाली असल्याचे ते म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला,तर मावळ व शिरूरमध्येही पक्षाचे खासदार करू, असे त्यांनी सांगितले.तर, हे दोन्ही मतदारसंघ भाजपकडे घेतले,तर तेथे पक्षाचे खासदार असतील, असे भाजपचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनीही सांगितले. अशीच भावना भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनीही व्यक्त केली. हे दोन्ही मतदारसंघ भाजपकडे घ्या, तेथे आपले खासदार असतील, असे ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com