पुण्यातील या पराभवामुळे मुख्यमंत्र्यांना बसला धक्का!

पुण्यातील या पराभवामुळे मुख्यमंत्र्यांना बसला धक्का!

वडगाव शेरी : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपकी बार दो सौ बीस पार अशी घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देऊन उमेदवार निवडले होते. त्यातील काही निवडक उमेदवार हे शंभर टक्के विजय होतील, अशी खात्री मुख्यमंत्र्यांना होती.

 पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचाही त्यात समावेश होता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू आणि तरुण सहकाऱयांपैकी एक समजले जाणारे येथील भाजपचे उमेदवार जगदीश मुळीक यांना अनपेक्षितरित्या निसटता पराभव स्वीकारावा लागला.

हा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः जगदीश मुळीक यांच्याशी संपर्क साधून , तुझा पराभव हा माझ्यासाठी धक्का असल्याचे सांगितले. 

 पाच वर्षपूर्वी  माजी आमदार जगदीश मुळीक यांनी या मतदारसंघात निकराने लढा देत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत भाजपचे कमळ फुलवले होते. त्यानंतर झालेल्या पुणे महानगर पालिका निवडणुकीत त्यांनी भाजप नगरसेवकांची संख्या एक वरून 14 पर्यंत वाढवली. शिवाय या विधानसभा निवडणुकीत आपल्या राजकीय मुत्सद्दीपणाची चुणूक दाखवत त्यांनी येथील राष्ट्रवादीचे मोठे नाव असलेले माजी आमदार बापू पठारे यांचा भाजप मध्ये प्रवेश घडवून आणला.

यासोबत या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका  नगरसेविकेस भाजपचे काम करण्यासाठी सोबत घेतले. पूर्व पुण्यात पक्ष वाढीसाठी जगदीश मुळीक यांनी सुरु केलेले प्रयत्न हे मुख्यमंत्र्यांच्या नजरेतुन सुटले नाहीत.

या अगोदर वर्षभरापूर्वी जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक यांना पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले होते. त्यावेळी स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी पुणे शहरातून मोठी स्पर्धा होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या तरुण सहकार्-यावर विश्वास दाखवला. तेव्हापासून जगदीश मुळीक हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाऊ लागले.

या विधानसभा निवडणुकीपूर्वी मंत्रालय झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या चार-पाच आमदारांच्या कामगिरीचा उल्लेख केला. त्यात त्यांनी आवर्जून जगदीश मुळीक यांच्या चांगल्या कामगिरीचा उल्लेख केला होता. पुण्यातील 100 टक्के विजयाची खात्री असणाऱ्या जागांपैकी कोथरूड सोबत वडगाव शेरीचे नाव घेतले जात होते. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरे यांनी बारकाईने नियोजन करत जगदीश मुळीक यांच्यावर निसटत्या मताधिक्याने मात केली.

हा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जगदीश मुळीक यांना मोबाईलवर संदेश पाठवला. त्यात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, जगदीश तुझा पराभव हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे. तू तरुण आहेस, तुझें भविष्य उज्ज्वल आहे आणि भविष्यात  तुला खूप चांगल्या संधी आहेत. त्यामुळे काम सुरू ठेव.मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या या संदेशामुळे जगदीश मुळीक आणि येथील भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. 

परिणामी निकालानंतर सलग तीन दिवस मुळीक यांच्या कार्यालयात प्रत्येक प्रभागनिहाय कार्यकर्र्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत असून त्याला शेकडो कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी उपस्थिती लावत आहेत. 

कार्यकर्त्यांना उद्देशून जगदीश मुळीक म्हणाले, पुणे महापालिकेत आणि राज्यातही आपली सत्ता आहे. त्यामुळे आपले कोणतेही काम आडणार नाही.  मतदारसंघात सुरू असलेली कामे आपण पुणे महानगरपालिका आणि राज्य शासनाच्या मदतीने मार्गी लावणार आहोत. त्यामुळे येणारा काळ भाजपचाच असेल. आपण दुप्पट जोमाने काम करणार आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com