cm fadanvis irritated about flex in kothrud | Sarkarnama

कोथरूडमधील `त्या` होर्डिंगमुळे मुख्यमंत्र्यांवरही वैतागण्याची वेळ

उमेश घोंगडे 
रविवार, 15 सप्टेंबर 2019

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेसाठी उभारण्यात आलेल्या एका बेकायदा होर्डिंगमुळे मुख्यमंत्र्यांवरही वैतागण्याची वेळ आली. या फ्लेक्समुळे एका रुग्णवाहिकेला रस्ता मिळू न शकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता होर्डिंगबाजीमुळे कोणाला उमेदवारी मिळणार नसल्याचा इशारा दिला.

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेसाठी उभारण्यात आलेल्या एका बेकायदा होर्डिंगमुळे मुख्यमंत्र्यांवरही वैतागण्याची वेळ आली. या फ्लेक्समुळे एका रुग्णवाहिकेला रस्ता मिळू न शकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता होर्डिंगबाजीमुळे कोणाला उमेदवारी मिळणार नसल्याचा इशारा दिला.

फडणवीस यांची महाजनादेश यात्रा काल (14 सप्टेंबर) पुण्यात होती. या यात्रेच्या स्वागतासाठी फ्लेक्स लावण्यावरून कोथरूडमध्ये भाजपच्या  आमदार मेधा कुलकर्णी आणि पक्षातील दुसरे इच्छुक मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांत वाद झाला होता. त्यामुळे कोथरूडमधील फ्लेक्सबाजीचा विषय आधीच मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला होता. 

महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी लावलेले बेकायदा फ्लेक्स, होर्डिंग काढून टाकावेत, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी काल शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांना दिला होता. मिसाळ यांनीही तशा सूचना खाली दिल्या होत्या. मात्र कोथरूडमधील हा फ्लेक्स रस्त्यात तसाच राहिला. या फ्लेक्सवर आमदार मेधा कुलकर्णी यांचा फोटो होता. तो फ्लेक्स रस्त्यातच आल्याने वाहतुकीला अडथळा झाला होता.  त्यामुळे एका रुग्णवाहिकेला रस्ता मिळू शकला नाही. त्याचा व्हिडीओ सोशल मिडियात व्हायरल झाला. त्यावरून लोकांनी संताप व्यक्त केला.

या साऱ्या प्रकाराबाबत मुख्यमंत्र्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. `बेकायदा फ्लेक्स किंवा होर्डिंगला आपला पाठिंबा नाही. हे चुकीचे  ते काढून टाकण्याचा आदेश मी दिला होता. यानिमित्ताने मी अशांना इशारा देऊ इच्छितो की होर्डिंगबाजीमुळे कोणला तिकिट मिळणार नाही तर ते कामामुळे मिळणार आहे, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपले मत व्यक्त केले. यावर कारवाई काय करणार, असा प्रश्न विचारल्यावर आमचा पक्ष यावर योग्य ती कारवाई करेल, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानाचा कोथरूड मतदारसंघापुरता जो तो आपापल्या परीने अर्थ लावत होता. 

वाचा आधीची बातमी- पुणे भाजपात होर्डिंग युद्ध; आमदार कुलकर्णी आणि मोहोळांच्या कार्यकर्त्यांत हाणामारी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख