राष्ट्रवादीने कलम ३७० रद्द करायला पाठिंबा का दिला नाही : देवेंद्र फडणवीसांचा बारामतीत सवाल (व्हिडिओ)

कलम 370 रद्द करण्याच्या मुद्यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने लोकसभेत मतदान का केले नाही असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी आज शहरातील तीन हत्ती चौकात रथावरुन बारामतीकरांशी संवाद साधताना थेट शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला.
Chandrakant Patil - Devendra Phadanavis - Harshwardhan Patil and Bala Bhegede in Baramati
Chandrakant Patil - Devendra Phadanavis - Harshwardhan Patil and Bala Bhegede in Baramati

बारामती शहर : कलम 370 रद्द करण्याच्या मुद्यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने लोकसभेत मतदान का केले नाही असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी आज शहरातील तीन हत्ती चौकात रथावरुन बारामतीकरांशी संवाद साधताना थेट शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला. 

बारामतीतील सभेच्या साऊंड सिस्टीम व बॅनरवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याचा मुद्दा पकडत मुख्यमंत्री म्हणाले, ''ज्या वेळी मी बारामतीकडे येण्यासाठी निघालो मला सांगण्यात आल की राष्ट्रवादीने एवढा धसका घेतला की त्या साऊंड सिस्टीम व बँनरव आक्षेप घेतला, फार घाबरले आहेत,  पण त्यांना हे माहिती नाही की हम मोदीजी के बाशिंदे है, हमारा आवाज कोई बंद नही कर सकता, मी तर माझी साऊंड सिस्टीम सोबत घेऊनच चालतो आणि जनतेपर्यंत जातो.
बारामतीमध्ये परिवर्तनाची हवा मला दिसते आहे, बारामतीत प्रवेश केल्यापासून लोकांनी जे उत्स्फूर्त स्वागत केले, इथे केवळ स्वागत सभा ठरविली होती, पण स्वागत सभेला तुम्ही महाजनसभेमध्ये तुम्ही परिवर्तीत केले त्या बद्दल बारामतीकरांचे मी आभार मानतो.''

ते पुढे म्हणाले, ''विरोधी पक्षांना गळती लागली आहे, काल छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. आता छत्रपतींचे वंशज आमच्या सोबत आहेत. पुणे जिल्ह्यातही राष्ट्रवादीत कोणी राहण्यास तयार नाही.'' हे का होतय असे सांगताना, बुरे काम बुरा नतीजा सुन भाई चाचा आ भतीजा...असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार व अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. 

''नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे परिवर्तन झाले, महायुतीच्या सरकारने प्रत्येक व्यक्तीच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पाच वर्षात आम्ही सगळे केले असा माझा दावा नक्की नाही पण गेल्या पंधरा वर्षांच्या तुलनेत तिप्पट काम गेल्या पाच वर्षात आम्ही करुन दाखविले. मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकालात आम्ही काढले. शेतक-यांना दरवर्षी दहा हजार कोटी रुपये देण्याचे काम आम्ही केले. रस्त्यांचे जाळे मजबूत केले. सिंचनाचे बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरु केले. पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पांना निधी दिला. अवर्षणप्राप्त भागासाठी पाणी पोहोचविण्याचे काम सरकारने केले. आगामी काळात सर्वांना घरे देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.'' असे फडणवीस यांनी सांगितले.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री बाळा भेगडे, खासदार अमर साबळे, हर्षवर्धन पाटील आदींचे स्वागत बाळासाहेब गावडे, अविनाश मोटे,  दिलीप खैरे, प्रशांत सातव, नितीन भामे, कुलभूषण कोकरे, रंजन तावरे, पृथ्वीराज जाचक, सतीश फाळके आदींनी केले. मुख्यमंत्री भाषण संपवून रथातून बाहेर पडताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच वादा अजितदादाच्या घोषणा दिल्या. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com