CM Devendra Fadnavis selects MP Sanjay Dhotre to balance Akola BJP politics | Sarkarnama

खासदार धोत्रेंच्या निवडीमागे मुख्यमंत्र्यांची दूरदृष्टी !

सरकारनामा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

 आगामी काळात येणाऱ्या निवडणुका पाहता अकोल्यासारखा भाजपचा बुरूज अंतर्गत कलहाने ढासळणार नाही, याची खबरदारी घेण्याचे काम करण्यात आले. धोत्रे यांना मंत्रिपदाचा दर्जा असणारे उपाध्यक्ष पद दिल्याने त्यांचा गट थोडा मवाळ होईल, अकोल्यातील भाजपमधील अंतर्गत कुरबूरी कमी होतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनाही वाटत असावी.   

अकोला :  महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेवर महत्वाचे असलेले मंत्रिदर्जाचे  उपाध्यक्षपद अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा सुरू झाली आहे. अकोल्यात ज्या पद्धतीने भाजपमध्ये पालकमंत्री विरुद्ध खासदार गट, असे चित्र तयार झाले आहे, जी अंतर्गत धूसफूस वाढत आहे. त्याला ब्रेक लावण्यासाठी ही कसरत तर नाही ना असाही प्रश्न उभा राहत आहे.

मुळात अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे समजले जातात. त्यामुळे विधान परिषदेवर असूनही डॉ. पाटील यांना गृहराज्यमंत्रिपदासह विविध महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी व अकोल्याचे पालकमंत्री बनविण्यात आले. गेल्या काही काळापासून येथील भाजपमध्ये उभी दरी निर्माण झाली आहे. अकोल्याचे पालकमंत्रिपद भाजपकडे आहे. जिल्हयाचे खासदार, तसेच जिल्ह्यात सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत. 

असे असूनही अधिक गटतट निर्माण झाले. डॉ. पाटील यांच्याविरुद्ध खासदार धोत्रे समर्थक अशी दरी निर्माण झाली. काही महिन्यांपूर्वी खासदार व त्यांच्या समर्थक लोकप्रतिनिधींनी माध्यमांसमोर बोलताना थेट पालकमंत्र्यांविरुद्ध मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले होते. मुख्यमंत्र्यांनी तातडीने पावले उचलावीत यासाठी ‘डेडलाइन’सुद्धा दिली होती. ही डेडलाइन केव्हाच उलटून गेली. कार्यकर्त्यांसह नागरिकांनाही याचा विसर पडला.  

आता दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्र्यांनी भाजपचे विदर्भातील ज्येष्ठ खासदार असलेले संजय धोत्रे यांना कृषी व शिक्षण संशोधन परिदषेच्या उपाध्यक्षपदी नेमल्याची वार्ता आली. या निवडीचा व उपरोक्त घडामोडींचा काही संबंध असेल किंवा नसेलही, परंतु मुख्यमंत्र्यांनी योग्य संधी साधली आहे, हे मात्र खरे. आगामी काळात येणाऱ्या निवडणुका पाहता अकोल्यासारखा भाजपचा बुरूज अंतर्गत कलहाने ढासळणार नाही, याची खबरदारी घेण्याचे काम करण्यात आले. धोत्रे यांना मंत्रिपदाचा दर्जा असणारे उपाध्यक्ष पद दिल्याने त्यांचा गट थोडा मवाळ होईल, अकोल्यातील भाजपमधील अंतर्गत कुरबूरी कमी होतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनाही वाटत असावी. 

संजय धोत्रे हे कृषी क्षेत्रातील एक जाणकार नेते म्हटले जातात. शेतमालाला हमीभाव, दुप्पट उत्पन्न, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, कृषी खात्यातील लालफितशाही यावर ते सातत्याने बोलत असतात. खासदार धोत्रे यांचे एक कृषी विज्ञान केंद्रसुद्धा अकोल्यात कार्यरत आहे.  त्यांची आता महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर निवड झाल्याने राज्यस्तरावर काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. त्यांना आजवर कृषी यंत्रणेत जे-जे ‘गॅप’ दिसत होते ते दूर करण्याचे अधिकार आता थेट हातात मिळाले आहेत. 

महाराष्ट्रात असलेल्या चारही कृषी विद्यापीठांमध्ये प्रभावी समन्वय व सुसूत्रता साधण्यासाठी १९८४ पासून ही महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद काम करीत आहे.  कृषी विद्यापीठांच्या कार्याचा आढावा, मूल्यमापन, पर्यवेक्षण आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या परिषदेवर असते. शेतकरी आज सर्वबाजूंनी अडचणीत आलेला आहे. दरवर्षी नवनवीन किड, रोगांनी पिकांचे नुकसान होते. विद्यापिठांचे संशोधन काळसुसंगत कसे होईल यासाठी धोत्रे हे एक मार्गदर्शक म्हणून मोठी भूमिका बजावू शकतात.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख