मुख्यमंत्र्यांकडून तरंगफळच्या तृतीयपंथीय सरपंचाचे अभिनंदन 

सोलापूर जिल्ह्यातीलतरंगफळच्या सरपंचपदावर ज्ञानू शंकर कांबळे या तृतीयपंथियाने बाजी मारली आहे. थेट जनतेतून निवडून येणारा देशातला पहिला तृतीयपंथीय सरपंच होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा त्यांचे अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून तरंगफळच्या तृतीयपंथीय सरपंचाचे अभिनंदन 

माळशिरस तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या मतमोजणीची प्रक्रिया आज पार पडली. काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत विरोधक सत्तेत आले. काही मंडळी आपले गड राखण्यात यशस्वी झाली. गड जिंकला, गढी अभेद्य ठेवली, वाघानं मैदान मारलं, चारी मुंड्या चित केला.... अशा मथळ्यांचे विजयाचे उन्मेष सोशल मिडीयावर पहायला मिळाले. मात्र गावगाड्यात या सर्वांच्या आवेशापेक्षा जास्त चर्चा तरंगफळच्या निवडणुकीची रंगली आहे. त्याचे कारण ही तसेच आहे. तरंगफळच्या सरपंचपदावर ज्ञानू शंकर कांबळे या तृतीयपंथियाने बाजी मारली आहे. थेट जनतेतून निवडून येणारा देशातला पहिला तृतीयपंथीय सरपंच होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा त्यांचे अभिनंदन केले आहे.

तरंगफळ हे तालुक्‍यातील आडवळणी गाव आहे. अन्य गावांप्रमाणेच येथे ही रस्ते, वीज, पाणी अशा समस्या आहेतच. गटा-तटाचे राजकारण, आकस, मत्सर, इर्षा, गावगुंड्या हे सगळे येथे देखील ठासून भरलेले आहे. अशातच ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. सरपंचपदाच्या सोडतीत सरपंचपद मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले. या आरक्षण निश्‍चितीनंतर आपल्या ऐकण्यातला उमेदवार देण्यासाठी पॅनेलप्रमुखांचे प्रयत्न झाले. माजी सरपंच आणि भाजपाचे जिल्हा चिटणीस असलेल्या सुरेश तरंगे यांच्या गटात सरपंच पदासाठी एकापेक्षा अधिकजण इच्छुक होते. एकच उमेदवार निश्‍चित करणे कठीण झाले. कोणी मागे सरायला तयार नव्हते. या अडचणीतून मार्ग काढताना पॅनेलमधील प्रमुखानी ज्ञानू कांबळे यांना सरपंचपदासाठी उभे करण्याचा निर्णय घेतला. ही उमेदवारी पुढे आल्यावर या गटातील प्रबळ दावेदार इच्छुकांतून बाहेर पडले. 

ज्ञानू यांना अख्खी पंचक्रोशी "माऊली' म्हणून ओळखते. माऊलींना सरपंचपदाच्या रिंगणात उतरवण्यात मोठी जोखीम होती. प्रचारात थट्टा, मस्करी, विनोद आणि अनेक उपहासात्मक घटनाना तोंड दयावे लागणार होते. मात्र या गटातील मंडळीनी माऊली यांच्या नावाला पसंती दिली. त्यांच्या या धाडसाला दाद दिली पाहिजे. गावाचा प्रथम नागरिक होण्याचा मान माऊली यांच्या रुपाने एका तृतीयपंथीयाला देण्याचा विचार कृतीत आणणाऱ्या या मंडळीना जेवढे धन्यवाद दयावेत तेवढे थोडेच आहेत. पत, प्रतिष्ठा, पैसा आणि राजकीय खेळ्या पणाला लावून निवडणुकीत उतरण्याच्या या जमान्यात या गटाने हा मोठा धोका पत्करला होता. या निवडणुकीत माऊली यांच्या विरोधात सत्ताधारी गटासह सहाजण शड्डू ठोकून उभे होते. मात्र ज्यांनी माऊली यांना उमेदवारी दिली होती ते सर्वजन पूर्ण क्षमतेने कामाला लागले होते. माऊलीसुध्दा गटा-तटाचा विचार न करता प्रत्येक मतदारांशी संपर्क साधून मत देण्याची विनंती करीत होते. 

निवडणूक लागली, प्रचार रंगला, विरोधात उभा असलेल्यानी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन उपहासात्मक कोट्या केल्या. अशा उपरोधिक टीकेला टाळ्या आणि शिट्ट्यांची जोरदार दाद मिळाली. माऊली आणि त्यांना उमेदवारी देणाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे अनेक प्रयोग झाले. मात्र या परिस्थितीत न खचता माऊली आणि त्यांचे समर्थक मतदारांशी संवाद साधत राहिले. मतदान झाले. मतमोजणी झाली. निकाल जाहीर झाला. मतदान यंत्रातून बाहेर आलेल्या निकालाने मतदान केंद्रातील सर्वानाच धक्का बसला. आपल्या सहा प्रतिस्पर्ध्यांवर 167 मतांनी मात करुन माऊलींनी आपल्या नावावर विजय नोंदवला. 

आपल्या बोलीभाषेत तृतीयपंथीचा उल्लेख "छक्का' असाही केला जातो. योगायोगाने तरंगफळच्या सरपंचपदाच्या रिंगणात माऊलींसमोर असलेल्या उमेदवारांची संख्या सहा होती. या "सहा' जणाला नामोहरम करीत माऊलीने सीमापार "छक्का' लगावला आहे. निकाल जाहीर झाला, त्यावेळी समोरचे उमेदवार गर्भगळीत झाले होते. हे मतदान केंद्रात उपस्थित असणारे पहात होते. त्याचवेळी माऊली म्हणत होते, "मला सगळ्या गावाने मदत केलीय. सगळी आपलीच हायती.' 

थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून येणारे या देशातील ते पहिले तृतीयपंथीय आहेत. आता गावाचा कारभार त्याच्या हाती आलाय. याचा कसला लवलेश ही त्याच्या वागण्या-बोलण्यात नव्हता. कमालीची नम्रता आणि साधेपण असलेले माऊली या घटनेमुळे वृत्तवाहिन्यांवर झळकले आहेत. वर्तमानपत्रात त्यांचे फोटो छापलेत. आभिनंदनाचा वर्षाव होतोय. त्यांचा मोबाईल सतत सुरु आहे. अनेकजण त्यांचा मोबाईल नंबर मिळवून त्यांना शुभेच्छा दयायला धडपडत आहेत. माऊली मात्र पहिल्याच दिवशी या साऱ्याला वैतागून गेलेत. अभिनंदन, सत्कार, शुभेच्छा अशा कौतुक सोहळ्यांची त्यांना सवय नाही. त्यामुळे अशा प्रकारांना ते आजच वैतागलेत. "माऊली अभिनंदन!' असे मी म्हणालो, त्यावेळी ते खळखळून हसले. "कसले अभिनंदन करताय राव? वैतागून गेलोय. फोन तर बंदच नाही. कोण काय बोलतयं ते समजनाय एवढं, कान बधीर झाल्यात,' असे ते म्हणाले. आपल्याला राजकारणाची बिलकुल आवड न्हाय. मी तृतीयपंथी माणूस. रोज मागायला जावं लागतय. हे काय खरंय राव? असे सांगून ते म्हणाले, ""माझ्यावर सगळ्या गावाचं प्रेम आहे. आपल्याला सगळ्यांनी निवडून दिलय. आता गावासाठी जे चांगल करता येईल ते करायचं. जमेल तेवढा विकास करायचा आणि गावची चार पोरं चांगल्या वळणाला कशी लावता येतील ते बघायचं. बाकी आपलं रोजच रहाट गाडग मात्र बंद पडू द्यायच नाही. असे ठरवतोय. असे ते म्हणाले. 

माऊली म्हणजे जिंदादिल माणूस. राग-लोभ, जय-पराजय, मान-सन्मान या पलीकडची त्यांची मानसिकता आहे. गावावर आणि गावातल्या माणसांवर त्यांचे मनापासून प्रेम आहे. त्यामुळेच तर निवडणुकीत विरोध करणाऱ्या मंडळींबाबत त्याच्या मनात कसलाही राग नाही. कोणाचा द्वेष नाही. कोणाची जिरवायची भाषा त्यांच्या तोंडी नाही. माऊलीचे हे मोठेपण आता सर्वानी मान्य करायला हवे. गावगाड्यातील कारभाऱ्यांच्या ठायी माऊलीच्या विचारांचा थोडासा अंश तरी परावर्तीत व्हावा हीच अपेक्षा या निमित्ताने... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com