स्वत:च्या अंत्यसंस्काराला बोलावणाऱ्या शेतकऱ्यापेक्षा पक्षीय सोहळा महत्त्वाचा ! 

करमाळ्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत जाहीर केली आहे. त्या कुटुंबाची जबाबदारी सरकारने घेतली आहे. आणि लवकरात लवकर मदत पोहचेल असा मला विश्वास आहे. परंतु शेतकरी आत्महत्या हा आपल्या राज्यात एक गंभीर विषय बनला असून सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर तोडगा काढला पाहिजे. त्यासाठी ऑक्‍टोबर पर्यंत थांबू नये- नीलम गोऱ्हे, आमदार व शिवसेना प्रवक्‍त्या
स्वत:च्या अंत्यसंस्काराला बोलावणाऱ्या शेतकऱ्यापेक्षा पक्षीय सोहळा महत्त्वाचा ! 
स्वत:च्या अंत्यसंस्काराला बोलावणाऱ्या शेतकऱ्यापेक्षा पक्षीय सोहळा महत्त्वाचा ! 

मुंबई : करमाळा तालुक्‍यातील शेतकऱ्याने आत्महत्या करताना मुख्यमंत्री येईपर्यंत माझ्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू नका, अशी चिट्ठी लिहिली. संतापाने वीटमधील शेतकरी रस्त्यावर आले, मात्र मुख्यमंत्र्यांनी तिकडे न जाता मुबंईतील षण्मुखानंद सभागृहात मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळा साजरा करणे पसंद केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या असंवेदनशिलतेवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घणाघाती टीका केली आहे. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सरकारला तीन वर्षं पुर्ण झाल्याबाबत सोहळे साजरे करण्याचा पुर्ण अधिकार आहे. परंतु राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असताना अशाप्रकारे सोहळे साजरी करताना मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. कर्जमाफीसाठी पाच महिन्यांची मुदत सरकारने घेतली. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सरकारची ही चाल आहे. जो पक्ष स्वतः च्या मित्रपक्षाला विश्वासात घेत नाही, त्या भाजपवर काय विश्वास ठेवायचा? काही कागदपत्रांवर मुख्यमंत्र्यांनी सह्या घेऊन कर्जमाफीची घोषणा केली. कुठे आहे तो कागद ?? सगळ्यांना का नाही दाखवला?? शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ताबडतोब निर्णय घेऊन कर्जमाफी करा मग साजरे करा सोहळे, अशी सूचनाही चव्हाण यांनी केली. 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, " हे सरकार शेतकऱ्यांच्या थडग्यावर खोट्या सोहळ्याचे महाल बांधत आहे. राज्यात शेतकरी कर्जबाजारीपणामुळे स्वतःला संपवुन घेत आहे आणि राज्यातील हे सरकार तीन वर्षाच्या खोट्या आत्मप्रौढीचे सोहळे साजरे करत आहे. ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे.' 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, "करमाळा दुर्घटनेबाबात खुपच वाईट वाटते. मुख्यमंत्र्यांनी तिथे यावं अशी त्या शेतकऱ्याची इच्छा होती. परंतु आत्महत्या केलेल्या 4 हजार शेतकऱ्यांची तीच इच्छा होती की मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन पहावं की आमचे कसे हाल होत आहेत? तिथे न जाता मुख्यमंत्री षण्मुखानंद सभागृहात आपल्या पक्षाचा सोहळा साजरे करण्यात व्यस्त आहेत. कारण मुख्यमंत्र्यांना पक्षाच्या सोहळ्याला प्रथम प्राधान्य द्यावं असे वाटत असेल. परंतु हे फारच लज्जास्पद आहे. 

शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या कारभार माणुसकीशुन्य चालला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनाहिनपणे वागत आहेत. राज्यात रोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. याचा गाभिर्याने विचार करण्याची वेळ आली असताना तीन वर्षात काय केले, याची टिमकी मिरवण्यात मग्न आहेत. सरकारच्या आनास्थेमुळे चालती बोलती माणसं जगातून निघून चालली आहेत. अत्यंत संतापजनक घडत असताना मुख्यमंत्री मात्र, सोहळे साजरे करण्यात व्यस्त असल्याची टीका राऊत यांनी केली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, "मुळात या सरकारला शेतकऱ्यांविषयी देणेघेणे राहिलेले नाही. शेतकरिद्रोही असलेले हे सरकार आपला नाकर्तेपणा लपवत आहे. त्यांच्या या नाकर्तेपणाचा शेतकऱ्यांच्या मनोबलावर मोठा परिणाम होत आहे. यास्थितीत तीन वर्षाचे सोहळे साजरे करणे आणि आत्महत्या करत असलेल्या शेतकऱ्यांच्या घडलेल्या घटनांकडे दुर्लक्ष करणे यातूनच या सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली भूमिका स्पष्ट होते.' 

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम म्हणाले, करमाळ्याची घडलेली घटना यातनादायी आहे. अतिशय दु:खद व खेदजनक आहे. दिवसेंदिवस आत्महत्या वाढत आहेत. हा प्रश्‍न सरकारने गांभीर्याने हाताळला पाहिजे. मानवी जीवनाची किंमंत पृथ्वीपेक्षा अधिक असल्याचे मागे एका कार्यक्रमात अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने सांगितले. मृत्यूनंतर त्याची मुले, पत्नी, संसार, आई-वडील सर्वच संपून जाते. याबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असलीतरी या घटना घडल्यानंतर उपाययोजना न करता घटना घडू न म्हणून सर्वांनी एकत्रित येवून उपाय शोधण्याची आज वेळ आली आहे.' 

कॉंग्रेस आमदार नितेश राणे म्हणाले,"करमाळ्याच्या घटनेत मुख्यमंत्र्यांच्या या वर्तवणुकीवरून सरकार किती असंवेदनशील आहे हे दिसून येते. खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना संपर्क साधून त्यांना धीर दिला पाहिजे. परंतु मुख्यमंत्री सोहळे साजरी करून स्वतःची पाठ थोपटण्याकडे व्यस्त आहेत. मुख्यमंत्र्यांनी सगळे कार्यक्रम रद्द करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर पणे विचार करून निर्णय घेण्याची वेळ आली आहे.' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com