बारामतीकरांचा इंदापूरला असलेला सासुरवास बंद करणार : मुख्यमंत्री

बारामतीकरांचा इंदापूरला असलेला सासुरवास बंद करणार : मुख्यमंत्री

इंदापूर : हर्षवर्धन पाटील हे जनतेची नाळ असलेला उमदा नेता असून त्यांचा मंत्रिमंडळात काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. मंत्रिमंडळात काम करताना त्यांनी कधी विरोधकांवर वार केले नाहीत तर त्यांनी सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका बजावली. त्यामुळे महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी त्यांना जनादेश द्या, इंदापूर तालुक्याचे पाण्यासह  सर्व प्रश्न सोडवण्यास मदत करतो. सभेची गर्दी पाहता हर्षवर्धन पाटील हे जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणार असून दि. 24 ऑक्टोबर रोजी गुलाल पाटील यांच्यावरच पडणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

भाजपप्रणित महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्घ नवीन प्रशासकीय इमारती शेजारील मैदानात आयोजित विराट सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी महादेव मोहिते या अपक्ष उमेदवाराने हर्षवर्धन पाटील यांना लेखी पाठींबा दिला तर प्रल्हाद भोंग यांनी भाजपात प्रवेश केला.

लोकसभेला हर्षवर्धन पाटील यांना भाजपाचे आमंत्रण दिले होते मात्र त्यांनी यायला वेळ लावला. त्यांनी आत्तापर्यंत बारामतीकरांचा बराच सासुरवास सहन केला. मात्र आता ते माहेरी आले आहेत यापुढे त्यांना हा सासुरवास सोसावा लागणार नाही, असे वाक्य मुख्यमंत्र्यांनी बोलताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, मी, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व हर्षवर्धन पाटील हे भोले-नाथाचा त्रिशूल आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. बारामतीचे नेते येऊन त्रास देतील म्हणून त्यांना घाबरून जाऊ नका. मी बारामतीकरांचा बंदोबस्त करण्यास आलो आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा जनतेचा नेता आमच्याकडे आल्याने इंदापूर तालुक्याच्या विकासास डबल इंजिन मिळाले आहे. आमच्या अगोदर आघाडी सरकारने अनेक सिंचन प्रकल्प राबवले, मात्र त्यांची कार्यपद्धती आम्हास मान्य नाही असे म्हणत त्यांनी अजित पवार यांना चिमटा घेतला.

पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पूर तर त्याच जिल्ह्यात पाणी टंचाई झाली. त्यामुळे 22 लोकांची वर्ल्ड बँकेची टीम आणून पुराच्या पाण्याचा अभ्यास केला आहे. सदर पाणी कर्नाटक व महाराष्ट्राचे नसून पुराचे आहे. त्यामुळे सदर पाणी वळवून दुष्काळी भागात आणण्याचा निर्णय घेतला आहे. कृष्णा भीमा व निरा भीमा स्थिरीकरण प्रकल्प पूर्ण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे.  हर्षवर्धन पाटील व जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी उपस्थित केलेले सर्व प्रश्न सोडवले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील म्हणाले, ``इंदापूर तालुक्याचा विकास आराखडा तयार केला असून केंद्र व राज्याच्या माध्यमातून तो अमलात आणला जाईल. जो विकासासोबत येईल, तीच आमची जात आहे. आम्ही माणसे जोडण्याचे काम केले असून चार पिढ्या जनतेची सेवा करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचे कुलदैवत इंदापूर तालुक्यात नारसिंहपूर येथे आहे, त्यामुळे आमदार देखील भाजपचाच हवा असे म्हणत त्यांनी गिरीश महाजन यांनी तालुका पाण्यासाठी दत्तक घेतला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. त्यामुळे सब का साथ सब का विकास करण्यासाठी मला विक्रमी मताधिक्याने विजयी करा. मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी आपण विकासासाठी पार पाडू.

यावेळी आप्पासाहेब जगदाळे, अशोक घोगरे, मारुतराव वनवे, तुकाराम काळे, रामभाऊपाटील, निलेश देवकर, संदिपान कडवळे, माऊली चौरे, नानासाहेब शेंडे, मुरलीधर निंबाळकर, पांडुरंग शिंदे, माऊली वाघमोडे, आकाश कांबळे, नितीन शिंदे आदींची भाषणे झाली.

यावेळी पद्माताई भोसले, बाबासाहेब चवरे, लाला -साहेब पवार, पृथ्वीराज जाचक, अविनाश घोलप, बाळासाहेब घोलप, अंकिता शहा, मुकुंद शहा, भरत शहा, उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, मंगेश पाटील, बाळासाहेब पाटील, गोरख शिंदे, रामवर्मा आसबे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रचारप्रमुख ऍड कृष्णाजी यादव,विजय कुमार फलफले आणि रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com