मुख्यमंत्र्यांनी `कीटकनाशक` फवारले खरे; पण ते निष्क्रियतेचे तण रोखणार?

यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. ही ओळख पुसण्यासाठी प्रशासनाने येथे अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे, असा आदेशमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.बोगस किंवा अनधिकृत कीटकनाशक आणि बियाणे विकणार्‍यांना कदापि सोडणार नाही. केवळ विक्रेतेच नाही तर कंपन्यांवरसुद्धा कारवाई केली जाईल, असाही इशारा त्यांनी दिला. खरेच त्यामुळे प्रशासन हलेल?
मुख्यमंत्र्यांनी `कीटकनाशक` फवारले खरे; पण ते निष्क्रियतेचे तण रोखणार?

यवतमाळ : कीटकनाशक फवारणीतून विषबाधेने शेतकर्‍यांचे झालेले मृत्यू अतिशय गंभीर बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आणि विशेष चौकशी पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी येथील प्रशासनाच्या निष्क्रियतेवर कीटकनाशक फवारले खरे, पण त्यामुळे खरेच फरक पडणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नफा कमाविण्यासाठी शेतकरी, शेतमजुरांचे जीव घेणार्‍या कंपन्यांना राज्यशासन योग्य धडा शिकवेल. यात कोणतीही हयगय केली जाणार नाही. त्यामुळे विषबाधेसाठी जबाबदार असलेले अनधिकृत बियाणे, कीटकनाशकांची विक्री करणार्‍यांवर यंत्रणेने कडक कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कृषी विभागाची यंत्रणा इतके दिवस का झोपली, संबंधित शेतकऱयांवर तातडीने उपचार का झाले नाही, याबाबत त्यांनी थेट कारवाई करण्याचे मात्र टाळले.

बैठकीला पालकमंत्री मदन येरावार, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार डॉ. अशोक उईके व राजेंद्र नजरधने, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी मान्यवर उपस्थित होते.

यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. ही ओळख पुसण्यासाठी प्रशासनाने येथे अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बोगस किंवा अनधिकृत कीटकनाशक आणि बियाणे विकणार्‍यांना कदापि सोडणार नाही. केवळ विक्रेतेच नाही तर कंपन्यांवरसुद्धा कारवाई केली जाईल. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह संपूर्ण यंत्रणेने फिल्डवर काम करावे. कोणाचाही विषबाधेने मृत्यू ही गंभीर बाब आहे. आलेल्या प्रत्येक रुग्णांवर तातडीने कसे उपचार करता येतील, त्याला डॉक्टरांनी प्राधान्य द्यावे. बोगस बियाणे आणि कीटकनाशक इतर राज्यातून जिल्ह्यात अनधिकृतरीत्या येत असेल; तर त्याची चौकशी करून जबाबदारी निश्‍चित करावी. कृषी केंद्र चालकांची बैठक घेऊन त्यांची एसओपी अंतिम करावी, त्यासोबतच फवारणी करणार्‍यांची कार्यशाळा घेऊन त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. मुख्यमंत्र्याच्या या आदेशानंतर येथील यंत्रणा हलणार का, हाच प्रश्न उपस्थित आहे.

केंद्र शासनाचा कीटकनाशक संदर्भात असलेल्या कायद्यात राज्य सरकारतर्फे काही सुधारणा करण्यात येतील. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयात अँन्डीडोट्स उपलब्ध करून देण्यात येतील. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, याबाबत राज्य शासन काळजी घेईल. जिल्हास्तरावरची वैद्यकीय अधिकारी भरतीप्रक्रिया नियमित सुरू ठेवावी. डॉक्टरांना नियुक्तीपत्र देतानाच त्यांच्याकडून पूर्ण कालावधी केल्याशिवाय नोकरी सोडणार नाही, अन्यथा यानंतर कोणत्याही शासकीय नोकरीसाठी पात्र राहणार नाही, असा बॉन्ड लिहून घ्या, असाही इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

 यावेळी त्यांनी कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्राचा आढावा घेतला. जिल्ह्यातील सर्व खरेदी केंद्रे दोन दिवसांत सुरू झाले पाहिजेत. याबाबत जिल्हाधिकारी यांनी खात्री करून अहवाल द्यावा. जे व्यापारी कमी दराने खरेदी करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कर्जमाफीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ऑनलाईनप्रक्रिया केल्यामुळे कर्जमाफीचा लाभ खर्‍या लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. कर्जमाफीसाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे, विनाआधार कार्ड कोणालाही लाभ मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठक व केलेल्या उपाययोजनेसंदर्भात सादरीकरण केले. यवतमाळ येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात विषबाधितांच्या उपचारासाठी निधी अपुरा पडत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50 लाख रुपयांचा निधीची तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल, असे यावेळी सांगितले.

युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले. त्यामुळे पोलिसांनी विक्की राऊत, कृष्णा पुसनाके, ललित जैन, मयूर देसाई, अक्षय गिरी, राजिक पटेल आदींना अटक केली. कीटकनाशक फवारणी आंदोलनाचे प्रणेते देवानंद पवार यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. यवतमाळ जिल्हा दारूबंदी चळवळीचे नेतृत्व करणारे जिल्हा संयोजक महेश पवार यांना सकाळी 7 वा. त्यांच्या राहत्या घरी पोलिसांनी नजरकैदेत ठेवले. ही कारवाई गणेश भावसार, पोलिस निरीक्षक, घाटंजी यांनी केली. तसेच कळंब तालुक्याच्या संयोजिका मनीषा काटे यांनाही वडगाव पोलिसांनी नोटीस बजावून चेतावणी दिली. मुख्यमंत्री दौर्‍यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, आंदोलकांनी नारेबाजी, निदर्शने करू नये, म्हणून ही कारवाई करण्यात आली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com