Cm appeals to Doctors to Join work immediately | Sarkarnama

डॉक्टरांनी तात्काळ संप मागे घ्यावा -मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 23 मार्च 2017

ज्या नादान लोकांनी डॉक्टरांवर हल्ले केले आहेत त्यामुळे डॉक्टरांमध्ये असंतोष आहे त्याची दखल शासनाने घेतली आहे. मात्र संप करून डॉक्टरांनी गरीब रुग्णांना सेवा शुश्रुषा नाकारणे योग्य नाही.- फडणवीस

मंबई - सामान्य नागरिकांच्या हितासाठी आणि उपचाराविना गरिबांचा जीव जाऊ नये यासाठी डॉक्टरांनी तात्काळ संप मागे घ्यावा. रुग्ण सेवेपासून कुणालाही वंचित ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.

सदस्य मिलिंद माने यांनी डॉक्टरांच्या संपाबाबत औचित्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले ''डॉक्टरांवर होणारे निषेधार्ह आहेत. राज्य शासनाने हल्लेखोरांवर कारवाई केली आहे. यापूर्वीही डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांसंदर्भात कठोर कारवाई करण्यात आली आहे. हल्ले रोखण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्याच्या विधिमंडळानेही कायदे केले आहेत. वेळोवेळो राज्य शासनाने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेतला आहे.

सध्या डॉक्टरांचा जो संप सुरु आहे त्यामुळे सर्वाधिक हाल गरीब रुग्णांचे होत आहेत. डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी राज्य शासन स्वताहुन पुढाकार घेईल असे मी डॉक्टरांना आश्वस्त करतो. ज्या नादान लोकांनी डॉक्टरांवर हल्ले केले आहेत त्यामुळे डॉक्टरांमध्ये असंतोष आहे त्याची दखल शासनाने घेतली आहे. मात्र संप करून डॉक्टरांनी गरीब रुग्णांना सेवा शुश्रुषा नाकारणे योग्य नाही.''

ते पुढे म्हणाले, "राज्य शासन पूर्णपणे डॉक्टरांच्या पाठीशी आहे. मात्र असे असताना संपामुळे सामान्य नागरीकांचे अतोनात हाल होत आहेत. ईलाज न मिळाल्याने गरीबांना जीव गमवावा लागला आहे.

डॉक्टरांच्या बद्दल समाजात मोठा विश्वास आंहे. त्याना देवाचा दर्जा लोकांनी दिला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सामान्य रुग्णांना खितपत ठेवायचे, हे योग्य नाही. जे निरपराध रुग्ण आहेत त्यांना सजा भोगावी लागू नये,'' असेही मुख्यमंत्र्यानी सांगितले.

डॉक्टरांना संरक्षण देण्याची राज्य शासनाची तयारी असून संपामुळे समाजात चीड निर्माण होत आहे. त्यांच्यामध्ये रुग्णसेवेपासून वंचित ठेवल्याची भावना होत आहे याची दखल डॉक्टरांच्या संघटनांनी घ्यावी. संपाच्या माध्यमातून समाजाला शिक्षा देण्याचा अधिकार नाही. राज्य शासन डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात मार्ग काढण्यासाठी तयार आहे. मात्र, सामान्यांच्या हितासाठी व गरीब रुग्णांना उपचाराअभावी जीव गमविण्याची वेळ येऊ नये यासाठी संप मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख