विखे, शिंदेंच्या डबल इंजिनला महाजनांच्या मशिनची ताकद : मुख्यमंत्री

विखे, शिंदेंच्या डबल इंजिनला महाजनांच्या मशिनची ताकद : मुख्यमंत्री

नगर : जिल्ह्याला राधाकृष्ण विखे आणि पालकमंत्री राम शिंदे यांच्या रूपाने डबल इंजिन लाभले आहे आणि त्याला ओढण्यासाठी गिरीश महाजन यांची हॉर्सपॉवरची मशीन आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही,"" अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे व शिंदे यांचा गौरव केला. भाजपची महाजनादेश यात्रेअंतर्गत आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संगमनेरमध्ये सभा झाली. 

ते म्हणाले, यात्रा काढणे, ही भाजपची परंपरा आहे. विरोधात असताना संघर्ष यात्रा तर सत्तेत असताना संवाद यात्रा आम्ही काढली, यात वावगे काय. कॉंग्रेस- राष्ट्रवादीनेही अनेक यात्रा काढल्या, त्यांच्या आणि आपल्या यात्रेत फरक आहे. आमच्या यात्रेला जागा पुरत नाही, त्यांच्या यात्रेमुळे मंगल कार्यालयही भरत नाही. जनतेने त्यांना नाकारले, आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. ते इव्हीएमला दोष देतात. बटन मतदार दाबतो हे ते विसरतात. त्यांची अवस्था वर्गातल्या बुद्धू मुलासारखी आहे. अभ्यास न करता परीक्षेला जातो, आणि पेनला दोष देतो. सत्ता असताना केलेली मुजोरी व माजोरीमुळे त्यांना जनतेने नाकारले आहे. पुढील पंचवीस वर्षे त्यांना सत्ता मिळणार नाही, त्यांनी विरोधी पक्षाचा सराव करावा. पंधरा वर्षात त्यांच्या सरकारने केली नाही, एवढी कामे गेल्या पाच वर्षात आमच्या सरकारने केली, असे ते म्हणाले. 

मुख्यमंत्री म्हणाले, की येत्या दीड वर्षात निळवंडे धरण पूर्ण करण्याचे आश्वासन देत, न्यायालयाच्या इमारती निधीचे फ्लेक्‍स लागल्याबद्दल थोरातांना उद्देशून त्यांनी शेरेबाजी केली. मजबूत देशाबरोबरच वैभवशाली महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी तुम्हाला जनादेश मान्य आहे का, अशी पृच्छा करीत त्यांनी जनतेचा कौल घेतला. या वेळी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्‍याम जाजू, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार वैभव पिचड, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार मोनिका राजळे आदींसह मोठ्या प्रमाणात स्थानिक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिर्डी मतदारसंघातील 26 गावांमधील मोठ्या प्रमाणात शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

शेरोशायरीने सभा जिंकली 
""हवाओं का रूख बदल रहा है, अब हवाही करेगी रोशनी का फैसला, जान होगी वही दीया रोशन होगा..."" अशा शेरो शायरीने सुरवात करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेवर कब्जा केला. त्यांच्या शेरोशायरीला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादातच संगमनेरच्या आजच्या कार्यक्रमात परिवर्तनाची झलक बघायला मिळाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com