chiranjeevi-prasad-will-be-new-police-commissioner-aurangabad | Sarkarnama

चिरंजीवी प्रसाद औरंगाबादचे नवे पोलीस आयुक्त

सरकारनामा  
गुरुवार, 24 मे 2018

नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीवी प्रसाद यांची औरंगाबादचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सुत्रांनी दिला आहे.

औरंगाबाद :  नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीवी प्रसाद यांची औरंगाबादचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सुत्रांनी दिला आहे. 11 मे रोजी औरंगाबादेत उसळलेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर शहराला तात्काळ पोलीस आयुक्त द्या अशी मागणी सगळ्याच राजकीय पक्षांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

नुकतेच आमदारांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले होते, यावेळी दोन दिवसांत शहराला पोलीस आयुक्त देतो असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. 

चिरंजीवी प्रसाद यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अद्याप आपल्याला आदेश प्राप्त झालेले नाही हे सांगतानाच उद्या ते मिळण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील कचरा प्रश्‍नावरून मिटमिटा पडेगाव येथे झालेल्या दंगल प्रकरणी तत्कालीन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना शासनाने सक्तीच्या रजेवर पाठवले होते. मात्र कालवधी संपल्यानंतरही ते रूजू झाले नाही. 

दरम्यान, 11 मे रोजी शहरात दोन गटात दंगल होऊन त्यात दोघांचा बळी गेला, तर दहा कोटी रुपयांच्या मालमत्तेची देखील राखरांगोळी झाली. दोन समाजात या दंगलीने तेढ निर्माण झाल्यामुळे संवेदनशील शहराला पुर्णवेळ पोलीस आयुक्त न दिल्यामुळे मुख्यमंत्री व गृहविभागावर चौफेर टिका झाली. 

अखेर औरंगाबादच्या पोलीस आयुक्तपदी चिरंजीवी प्रसाद यांची नियुक्ती जवळपास निश्‍चित झाली आहे. येत्या दोन दिवसांत त्यांना आदेश प्राप्त होऊन ते रूजू होतील अशी माहिती आहे. 1996 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेले चिरंजीव प्रसाद 2002 ते 2005 दरम्यान, औरंगाबाद व जालन्याचे पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. 

26-11 च्या मुंबईवरील अतिरेकी हल्याच्यावेळी जे विशेष पथक स्थापन करण्यात आले हाेते त्यात चिरंजीवी प्रसाद यांची महत्वाची भूमिका हाेती. 

2011 मध्ये नागपूरचे डीआयजी म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांनतर सीआरपीएफ मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली हाेती. छत्तीसगड आणि बिहारमधील नक्षलग्रस्त भागात देखील त्यांनी उत्तम कामगिरी बजावली हाेती.

 2015 मध्ये त्यांची नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता नांदेडहून त्यांची औरंगाबादचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख