Chief minister - Udhhav Thakre verbal clash om mid term elections | Sarkarnama

मध्यावधी : शिवसेनेच्या भूकंपा आधीच मुख्यमंत्र्यांचा हादरा !

सरकारनामा वृत्त
गुरुवार, 15 जून 2017

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर दबाव वाढविण्यासाठी हे विधान केले आहे, असे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. शिवाय राष्ट्रपतीपदासाठी आवश्‍यक असलेल्या मतांची जुळवाजुळव भाजपने आधीच पूर्ण केली असल्याचा संदेशही मुख्यमंत्र्यांनी या आक्रमक पावित्र्यातून दिला असल्याचे मानले जाते. 

मुंबई : शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे परदेशवारीवरुन परतताच पुन्हा शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षाचे फटाके फुटू लागले आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच शिवसेनेला थेट आव्हान देत भाजप महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकीस तयार असल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांचा शब्द खाली पडून देतील तर ते उद्धव ठाकरे कसले! उद्धव ठाकरेंनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. भाजपने मध्यावधीवर पैसा खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, असा उपरोधिक सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर असताना जवळपास एकहाती कर्जमाफी जाहीर करून टाकल्यामुळे उद्धव ठाकरे अस्वस्थ आहेत. शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी बोलणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या उच्चाधिकार समितीतही शिवसेनेतर्फे फक्त दिवाकर रावते यांना एकट्याला सामावून घेण्यात आले तर भाजपचे चंद्रकांतदादांसह तीन मंत्री होते. 

त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जुलै महिन्यात मोठा राजकीय भूकंप होईल असे जाहीर वक्तव्य केले. तर भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी डास आणि चिलटांमुळे भूकंप होत नसतात, असा टोमणा शिवसेनेला लगावला.

त्यातच भर म्हणून की काय, भाजपमध्ये उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे चार्टर्ड अकाउंटंट खासदार किरीट सोमय्या पुन्हा सक्रिय झाले आहेत. मुंबई महापालिकेचा कारभार आणि कंत्राटदारांचे काळे उद्योग या विषयांचे निमित्त करून किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान सुरू केले आहे. 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाची माहिती देण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्या कर्जमाफी-कर्जमुक्तीबाबतच्या "संकल्पना' समजावून घेण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांची "मातोश्री'वर जाऊन भेट घेतली. उद्धव ठाकरे यांना भाजप महत्त्व देते हे अधोरेखित करण्यासाठी या भेटीपूर्वीच गाजावाजा करण्यात आला. उद्धव ठाकरे यांचा मूड कसा आहे याची चाचपणी या निमित्ताने चंद्रकांत दादांनी केली.

 

 उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत दादांच्या भेटीतही कर्जमुक्तीवरून शाब्दिक फुलझड्या झडल्याच. मितभाषी असलेल्या चंद्रकांतदादांनी उद्धव ठाकरेंचे काही बाऊंसर्स सोडून दिले तर एक-दोनवर फटकेही मारले असे समजते.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीपूर्वी वातावरण निर्मितीचा हा प्रयत्न होता. पण उद्धव ठाकरे यांनी जर तरची आणि सहकाऱ्यांशी चर्चा करण्याची भाषा करून भाजपवरील दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला, असे राजकीय वर्तुळात मानले जाते. 

या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक भाजप मध्यावधीसाठी तयार असल्याची तोफ डागल्याने राजकीय गोटात खळबळ निर्माण झाली आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून अमित शहा येत्या काही दिवसात उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. याची कल्पना असूनही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला मध्यावधीस आपण तयार असल्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख