The Chief Minister says, "Right now I am listening to Mrs Home Minister! '' | Sarkarnama

मुख्यमंत्री म्हणतात,"" सध्या मी मिसेस होम मिनीस्टरचं ऐकतोय ! '' 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोनाचं युद्ध आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शत्रू कुठून हल्ला करेल माहित नाही. त्यामुळे घरात राहिलं पाहिजे. आपण घराबाहेर गेलो तर शत्रू घरात येईल.

मुंबई : " सध्या मी मिसेस होम मिनीस्टरचं एकतो आहे, तुम्हीही तुमच्या होम मिनीस्टचं ऐका' असे सांगत घराबाहेर जाऊ नका, घराबाहेर पडला तर शत्रू आपल्यावर हल्ला करेल हे लक्षात घ्या. केंद्र सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आली आहे ती म्हणजे घरातील "एसी' बंद करण्याचा. कृपया करून घरातील एसी बंद ठेवा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

कोरोना हा मोठा शत्रू आहे. कोरोनाची तुलना जागतिक युद्धाशी करतो आहे. हे मोठे संकट आहे. या संकटाशी सामना करायचा आहे. घरातील आपल्या मातापित्यांची, मुलाबाळांची काळजी घ्यायला हवी. घरांमध्ये लोक एकत्र आले आहेत. घरातले एसी बंद करा,

घरातल्या खिडक्‍या दरवाजे उघडा असे आवाहन करून ठाकरे म्हणाले, की सध्याच्या घडीला अनेक घरांमध्ये कुटुंबीय एकत्र आले आहेत. ही एक सकारात्मक गोष्ट आहे. आपल्या कुटुंबीयांना वेळ द्या. स्वतःची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या असंही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 

घरांमधले एसी बंद करण्यासंबंधीचे निर्देश केंद्राकडून आले आहेत. आम्ही त्यांना सांगितलं की ते तर आम्ही केव्हाच सुरु केलं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आहे, घरातले एसी बंद ठेवा आणि दारं खिडक्‍या उघड्या ठेवा. चला हवा येऊ द्या, कारण असं केल्याने करोनाचा प्रादुर्भाव थांबवता येईल. 

कोरोनाचं युद्ध आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शत्रू कुठून हल्ला करेल माहित नाही. त्यामुळे घरात राहिलं पाहिजे. आपण घराबाहेर गेलो तर शत्रू घरात येईल. त्यामुळे घराबाहेर पडू नका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केलं. 

तसंच ज्यांच तळहातावर पोट आहे त्यांची काळजी सरकार घेणार आहे. सरकारच्या मदतीला आज अनेक हात येत आहेत. ज्या कंपन्यांनी त्यांचं उत्पादन बंद ठेवलं आहे त्या कंपन्यांना आम्ही विनंती केली आहे की माणुसकीचा विचार करुन त्यांचं किमान वेतन कापू नका अशीही विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स


संबंधित लेख