चिकन खाणारे राजू शेट्टी हे अक्कलशून्य : खोत यांची टीका

चिकन खाणारे राजू शेट्टी हे अक्कलशून्य : खोत यांची टीका

दौंड : राजू शेट्टी यांना चिकन फार आवडतं, ते चिकनप्रिय आहेत व त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात कडकनाथ कोंबडी पालन करण्याच्या आमिषाने झालेल्या कोट्यावधी रूपयांच्या फसवणूक प्रकरणात माझा किंवा कुटुंबीयांचा कोणताही सहभाग नसताना माझ्यावर निराधार आरोप करणारे माजी खासदार राजू शेट्टी हे अक्कलशून्य आहेत, अशी घणाघाती टीका राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.

दौंड तालुक्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. आमदार राहुल कुल यांच्यासह रयत क्रांती संघटनेचे प्रवक्ते तथा शासनाच्या ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य भानुदास शिंदे दौंड तालुकाध्यक्ष सर्फराज शेख या वेळी उपस्थित होते.

सदाभाऊ खोत म्हणाले, ``मला कोंबडी - अंडी विकायची गरज नाही. माझा दृष्टीकोन मोठा आहे व काही उद्योग - व्यवसाय केला तर ते मोठंच करीन. शेट्टी यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांची विचारांची दिवाळखोरी दिसून आली. त्यांनी नार्को टेस्टला तयार राहावं. त्यांच्याविरूध्द मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी या फसवणूक प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. ``

ते पुढे म्हणाले, `` पुरामुळे उसाचे 70 टक्के तर इतर पिकांचे 100 टक्के नुकसान झालेले आहे. ज्या पूरग्रस्त शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले नाही मात्र ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांनाही निकषानुसार सर्वसाधारण नुकसान भरपाईच्या तिप्पट भरपाई दिली जाईल. पूरग्रस्तांच्या शेतातील गाळ काढणे आणि ऊसतोड रोजगार हमी योजनांतर्गत केली जाणार आहे. ``

राज्यात महायुतीच्या 220 पेक्षा अधिक जागा येणार

राज्यात भाजप - शिवसेना महायुतीच्या 220 पेक्षा अधिक जागा येणार आहे. रयत क्रांती संघटनेने महायुतीकडे सांगली - इस्लामपूर, सातारा - उत्तर कराड, फलटण, सोलापूर - पंढरपूर - मंगळवेढा, माढा, धुळे - साक्री, नांदेड - नायगाव, बुलडाणा- चिखली, मेहकर, नासिक - येवला, नगर - श्रीरामपूर, मुंबई - मानखूर्द या बारा जागांची मागणी केली आहे. मी स्वतः इस्लामपूर मधून विधानसभा लढविणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com