इलेक्‍शन डिप्लोमसी: छगन भुजबळ- प्रशांत हिरेंची मध्यरात्री गळाभेट

दीपावलीच्या प्रकाशपर्वाचा मुहूर्त साधून माजी उपमुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या 'मधुरमुरली' या मालेगाव कॅम्प भागातील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
Bhujbal-Hire
Bhujbal-Hire

नाशिक :  दोन महिन्यांपूर्वी हिरे कुटुंब राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रवेशास उत्सुक होते. भुजबळांच्या भेटीनंतर तो प्रवेश लाबंणीवर पडला होता. मात्र त्यानंतर गेल्या महिन्यात माजी खासदार समीर भुजबळ यांची हिरे कुटुंबीयांशी सदिच्छा भेट झाली. त्यानंतर रविवारी मध्यरात्री छगन भुजबळ यांची मालेगावला भेट आणि रात्रीचे भोजन झाले. 

यावेळी त्यांचे माजी मंत्री प्रशांत हिरे , माजी शिक्षक आमदार डॉ. अपूर्वभाऊ हिरे व   डॉ. अद्वयआबा हिरे - पाटील यांनी  स्वागत केले.  या भेटीने मालेगाव- धुळे मतदारसंघात नवे राजकीय तरंग निर्माण झाले. त्यामुळे भुजबळ- हिरेंची ही सदिच्छा भेट होती की इलेक्शन  डिप्लोमसीचा भाग या चर्चेला उधाण  आले आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नंदुरबारला समता परिषदेचा मेळावा झाला. त्यानंतर नाशिकला परततांना सायंकाळी सहाला हिरेंच्या निवासस्थानी ही भेट अपेक्षीत होती. मात्र कार्यक्रमांच्या गर्दीने सायंकाळी सहाला येणाऱ्या भुजबळांना मालेगाव येथील हिरे यांच्या निवासस्थानी पोहोचण्यास मध्यरात्रीचे बारा वाजले. यावेळीही भुजबळ व हिरे या दोघांचेही समर्थक प्रतिक्षा करीत होते. 

महिनाभरात झालेली ही दुसरी भेट आहे. हिरे विधानसभा आणि लोकसभा दोन्ही निवडणुकांच्या उमेदवारीसाठी उत्सुक आहेत. स्वतः भुजबळ यांची नाशिक लोकसभा, नाशिक मध्य विधानसभा दोन्ही मतदारसंघात चाचपणी सुरु आहे. त्यामुळे हिरे यांच्या संघटन कौशल्याचा लाभ घेण्यासाठी ही भेट उपयुक्त ठरु शकते. त्यामुळे मालेगाव बाह्य व धुळे लोकसभा मतदारसंघातही त्याचे राजकीय पडसाद उमटणार असा निरोप गेला आहे .  ही भेट डिनर डिप्लोमसी की इलेक्‍शन कॅलक्‍युलेशन याबाबत चर्चा रंगली आहे . 

श्री. भुजबळ यांनी हिरे कुटुंबीयांशी चर्चा करीत त्यांच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतला. या वेळी झालेल्या चर्चेबाबत उत्सुकता आहे. माजी आमदार अपूर्व हिरे व युवानेते अद्वय हिरे यांनी श्री. भुजबळ यांचे स्वागत केले. यावेळी भुजबळ म्हणाले, "मी शब्दापेक्षा कृतीवर भर देतो. बोलून नाही तर करून दाखविणार आहे. इडापीडा टळो, बळीचे राज्य येवो, या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा''. या वेळी समता परिषद, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विविध नेते उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com