अंगणवाडी सेविकेचा मुलगा चेतन शेळके  झाला आय.  आर.  एस.  अधिकारी - Chetan Shelke becomes IRS officer by fighting against all odds | Politics Marathi News - Sarkarnama

अंगणवाडी सेविकेचा मुलगा चेतन शेळके  झाला आय.  आर.  एस.  अधिकारी

संपत देवगिरे :  सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 3 मे 2018

"यशस्वी व्हायचे असेल तर मार्गात अडथळे अनेक येतात. त्यावर मात करण्यासाठी सदैव अथक परिश्रमाची तयारी ठेवावी. अपयश आले तरकी खचु नये. त्यातुन कुठलेही ध्येय साध्य करता येते. प्रत्येक युवकाने असेच केले पाहिजे.'

- चेतन शेळके 

नाशिक :  मथुरपाडा (मालेगाव) गावातील चेतन शेळके 'युपीएससी' स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण झाला आहे . गावातून  'आयआरएस' सेवेत जाणारा तो पहिला युवक ठरला आहे. अंगणवाडी सेविका ललिता शेळके आणि टपाल खात्यातील कर्मचारी  मेघराज  शेळके यांचा तो मुलगा आहे . सामान्य परिस्थिती असूनही  असामान्य यश संपादन केल्याने तो गावकऱ्यांच्या कौतुकाचा विषय बनला आहे . 

'' दोनदा स्पर्धा परिक्षेत अपयश वाट्याला आले. त्यामुळे निराश झालो होतो. घरी परतणार होतो. मात्र वडिल सतत धीर देत राहिले. त्या प्रोत्साहनानेच मी तिसऱ्यांदा अथक तयारीनीशी परिक्षा दिली अन्‌ यशस्वी झालो.''असे चेतनने सांगितले .'युपीएससी' परिक्षेत तो   781 व्या स्थानी आला आहे. त्यामुळे क्रमानुसार चेतनला भारतीय महसुल सेवेत (आय.आर.एस.) नेमणुक मिळेल अशी अपेक्षा आहे. हे यश त्याला सहज मिळालेले नाही. त्यात अपार कष्ट आहेत. 

चेतनचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या तर माध्यमिक शिक्षण खेडगाव (दिंडोरी) येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले. त्यानंतर त्याने अभियांत्रिकी शिक्षणासाठी विखे पाटील महाविद्यालयात प्रवेश घेतला. मॅकेनिकल इंजिनिअरीगंची पदवी पुर्ण केली. स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी काही दिवस पुण्याला सराव केला. त्यानंतर दिल्लीत वाजीराज हा क्‍लास लावला. रोज अडीच तासांच्या बॅचमध्ये स्पर्धा परिक्षेचा सराव केला. क्‍लास झाल्यावर रोज सहा ते सात तास अभ्यास करावा लागत असे.

 कंटाळा आल्यावर परिसरात फेरफटका मारायचा अन्‌ पुन्हा अभ्यास हा त्याचा दिनक्रम होता. त्यात तो दोन वेळा अयशस्वी झाला. तिसऱ्यांदा यशस्वी झाला. त्याचे वडील मेघराज शेळके मालेगावला टपाल कार्यालयात नोकरी करतात. आई ललिता अंगणवाडीसेविका आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख