शरद पवार आणि विजय नवल पाटील यांची `केमिस्ट्री`

sharad pawar-vijay patil
sharad pawar-vijay patil

अमळनेर : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ज्यांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत. उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी आपले एक वलय निर्माण केले आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी नुकतीच शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली. राजकारणातील दोन दिग्गजांची ही भेट लक्षवेधी ठरली आहे. या दोन्ही नेत्यांची पदाधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखण्याची स्मरणशक्‍ती चर्चेचा विषय ठरत आहे. ८० वर्षांचे हे चिरतरुण आजही प्रवास दौरे करून राजकारण व समाजकारणात आपले योगदान देत आहेत.


गेल्या पंधरवड्यात राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील व ॲड. किरण सरनाईक यांनी अमरावती विभागीय अधिवेशनाचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. माजी मुख्यमंत्री (कै.) वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच राज्य शिक्षण संस्थेच्या सुवर्ण जयंतीनिमित्त होत असलेल्या कार्यक्रमांबद्दलही चर्चा झाली. या भेटीची चर्चाही सध्या चांगलीच रंगली आहे. दोन्हीही नेत्यांनी ऐंशिव्या वर्षात पदार्पण केले असले, तरी त्यांच्या उत्साहाला अन् जिद्दीला तोड नाही. राजकीय मुत्सद्देगिरी आणि जिद्दीला अनेक नेते ‘सॅल्यूट’ करतात.


विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत लोकसभेच्या सातारा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ‘राष्ट्रवादी’चे नेते शरद पवार यांच्या पायाला जखम असतानाही भरपावसात त्यांनी केलेले भाषण हे राजकारणाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले गेले आहे. शरद पवार यांनी कमी वयात मुख्यमंत्रिपद मिळविले होते. सुरवातीच्या काळात काँग्रेस, त्यानंतर स्वबळावर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून माजी मंत्री विजय नवल पाटील यांनीही वयाच्या ३२ व्या वर्षी केंद्रीय मंत्रिपद मिळविले होते. दोन्ही नेते त्यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय मानले जात. त्यांच्या ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतारही पाहिले आहेत. म्हणूनच त्यांना राजकारणातील ‘भीष्माचार्य’ तसेच ‘चाणक्य’ही म्हटले जाते. राजकारणातील मेहनतीला आणि परफॉर्मन्सला वय नसते, हे दोन्ही नेत्यांनी कार्यकर्तृत्वाने सिद्ध केले आहे.

आजारपणावरही केली मात!
शरद पवार आणि विजय नवल पाटील यांनी ज्या पद्धतीने राजकारणात वर्चस्व निर्माण केले आहे, त्याच पद्धतीने विविध आजारांवरही त्यांनी मात करीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शरद पवार यांनी दुर्धर समजल्या जाणाऱ्या कर्करोगावर मात केली आहे. विजय नवल पाटील यांच्यावरही २००८ मध्ये हृदय शस्त्रक्रिया झाली आहे. तसेच पायांवर दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आजारपणाला न घाबरता आजही ते नित्यनेमाने पहाटे पाचला उठून नियमित व्यायाम करतात. रोज शेकडो किलोमीटर प्रवास करत असतानाही त्यांचा उत्साह कायम असतो, हे विशेष. शिक्षण, पर्यावरण, निसर्ग, ऊर्जा, सेंद्रिय शेती या विषयांवरही त्यांचा गाढा अभ्यास आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com