भाजपने खडसेंना सोईस्कर पणे दूर केले - पृथ्वीराज चव्हाण

भाजपने खडसेंना सोईस्कर पणे दूर केले - पृथ्वीराज चव्हाण

औरंगाबाद : महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या अनेक मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. सभागृहात या विरोधात आम्ही आवाज उठवतो तेव्हा मुख्यमंत्री चौकशी सुरू आहे असे सांगतात. मुळात प्रकाश मेहता, सुभाष देसाई यांच्यासह ज्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांना पदावरून हटवल्याशिवाय त्यांची चौकशी पुर्ण कशी होऊ शकते असा सवाल करतांनाच भाजपने एकनाथ खडसे यांना मात्र भ्रष्टाचाराचा आरोप होताच सोईस्करपणे दूर केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. 

राफेल विमान खरेदी विषयावरील परिसंवादासाठी औरंगाबादेत आलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकार आणि आगामी निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे धोरण यावर पत्रकारांशी चर्चा केली. सुरुवातीलाच त्यांनी राज्यातील दुष्काळ आणि मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सरकार दुष्काळ जाहीर करून मोकळे झाले, पण त्यावर अंमलबजावणी होतांना दिसत नाही. केंद्राचे पथक महाराष्ट्रात पाहणी करून गेले, केंद्राची मदत येईल तेव्हा येईल, ती येणार हे गृहित धरून सरकारने तातडी पावले उचलायला हवीत. चारा छावण्यांच्या बाबतीत मुख्यमंत्री नकारात्मक आहेत. सतरा लाख टन चारा बाहेरून आणावा लागणार आहे, त्याचे कशाप्रकारे नियोजन केले आहे ? 

मुळात महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर करायलाच उशीर केला. आंध्र प्रदेश सरकारने 8 ऑगस्ट तर कर्नाटकने 17 सप्टेंबरला दुष्काळ जाहीर करत उपाय योजना देखील सुरू केल्या. महाराष्ट्रात मात्र अजूनही कुठल्याच हालचाली नाहीत. गेल्यावर्षी कृषी अर्थव्यवस्था 8 टक्‍यांनी घटल्याचा आरोप करतांनाच तुघलकी कारभार बंद करून सरकारने दुष्काळग्रस्तांना तातडीने दिलासा द्यावा अशी मागणी देखील चव्हाण यांनी केली. 

एमआयएमला सोबत घेणार नाहीच.. 
नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपची सत्ता असलेल्या तीन राज्यात कॉंग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. ही बदलाची सुरुवात असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या शंभर जागा घटतील आणि कॉंग्रेस-आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असा विश्‍वास चव्हाण यांनी व्यक्त केला. राज्यात वंचित बहुजन आघाडीशी बोलणी सुरू असल्याचे कॉंग्रेसकडून सांगितले जाते. पंरतु अशी कुठलही बोलणी सुरू नसल्याचे वंचित आघाडीकडून सांगितले जाते. या संदर्भात मी आघाडीच्या बाबतीतील चर्चांमध्ये नाही, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांशी माझे याविषयावर काही बोलणे झालेले नाही. हे जरी खरे असले तरी आमचे राज्यातील नेते व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकरांकडे दिला आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात कॉंग्रेसची ताकद वाढली असली तरी सगळ्याच राज्यांमध्ये अशी परिस्थिती नाही. त्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र घेऊनच आगामी निवडणूका आम्ही लढणार आहोत. 

वंचित आघाडीने एमआयएम शिवाय कॉंगेस सोबत जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. या मुद्याकडे लक्ष वेधले असता एमआयएमला सोबत घेणार नाही असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. आघाडीत कोणत्याही जातीयवादी पक्षाला स्थान राहणार नाही. मतांचे ध्रुवीकरण टाळण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे असे आमचे प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com