उदयनराजेंनी एकही काम सुचवले नाही : पृथ्वीराज चव्हाण

 उदयनराजेंनी एकही काम सुचवले नाही : पृथ्वीराज चव्हाण

कऱ्हाड : जनतेला गृहीत धरून पक्षांतर करणे ही अत्यंत चुकीची गोष्ट, आता जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल. जनतेने निवडून दिल्यानंतर अवघ्या चारच महिन्यात पक्ष बदलणे हा लोकशाहीचा केलेला खूनच आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी एकही काम सुचवले नाही. तसे सुचवले असेल तर त्यांनी त्याची कागदपत्रे दाखवावीत. सध्यातरी आमच्या पायाखालची वाळू सरकलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानसभा निवडणुकीतच कळेल, नक्की काय होणार आहे ते, अशीही टिका त्यांनी केली. 

माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात आपले नाव येत आहे. आपण निवडणुक लढवणार का, या प्रश्नावर आमदार चव्हाण म्हणाले, मी कऱ्हाड दक्षिणमधूनच आमदारकीची निवडणुक लढवणार आहे. खासदारकीत रस नाही. मात्र येथे कोणता उमेदवार द्यायचा ते राष्ट्रवादीने ठरवावे. त्यासह आघाडी कशी व्हावी, याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी सुचवलेले काम आपण केले नाही, असा आरोप होत आहे त्यावर आमदार चव्हाण म्हणाले, त्यांनी कोणते काम सुचवले होते. तसा कोणता प्रस्ताव त्यांनी दिला होता. याची कागदपत्रे त्यांनी द्यावीत. उगाच काहीही बोलून उपयोग नाही. त्यांनी एकही प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे त्यांचे काम रखडवण्याचा प्रश्नच येत नाही. 

माजी मुख्यमंत्र्याच्या पेनमध्ये शाई नव्हती, त्यांना पेन भेट दिला होता, असेही माजी खासदार उदयनराजे म्हणत आहेत. त्यावर त्यांनी उत्तर देण्याचे टाळत अशा प्रश्नाकडे लक्ष देवू नका, असेच सुचीत केले. यावेळी लोकशाहीत टीका करणे अधिकार आहे, तुम्ही आमच्यावर टिका केली तरी त्याचे उत्तर आम्ही देणारच, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

माजी खासदार उदयनराजे यांच्या पक्ष प्रवेशावर तुम्ही हा लोकशाहीचा खून आहे, अशी प्रतिक्रीया दिली, त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या पायाखालील वाळू सरकू लागली आहे, असे प्रत्युत्तर दिले आहे. त्यावर तुमचे काय मत आहे, असा प्रश्न विचारला. त्यावेळी आमदार चव्हाण म्हणाले, लोकशाहीत जनतेला गृहीत धरून निर्णय घेवू नयेत. जनतेचा कौल काय आहे, त्यांच्या विकासाचे नेमके स्त्रोत्र काय आहे, या सगळ्याचा सारासार विचार होणे गरजेचे आहे. लोकांनी निवडून दिल्यानंतर चारच महिन्यात तुम्ही जर पक्षांतर करत असाल, तर तो लोकशाहीचा खूनच आहे. त्यावर मी ठाम आहे. विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील. त्यावेळी कळेल की, कोणाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 

आमदार आनंदराव पाटील यांनी घेतलेल्या भुमिकेबाबत विचारले असता श्री. चव्हाण यांनी नो कॉमेंट्‌स असे एकच उत्तर दिले. कऱ्हाडला भूकंप संशोधन केंद्र आणले, मात्र तुम्ही त्यासाठी केवळ 48 कोटी दिले. राहिलेले पैसे भाजप सरकाने दिले आहेत, अशी टिका तुमच्यावर होत आहे, त्यावर आमदार चव्हाण म्हणाले, स्वाभाविक आहे, भाजपचे सरकार आहे, त्यांना पैसे द्यावेच लागणार आहेत. तो सरकारी प्रकल्प आहे. कॉग्रेसचा नाही. काहीही बोलून आणि मनोरंजन करणाऱ्या टिका योग्य नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो प्रकल्प माझ्यामुळे आला किंवा आणला गेला, हे ते मान्य करत आहेत. हेही महत्वाचे आहे. उर्वरीत रक्कम कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी ते देणारच आहेत. त्यामुळे त्यात विशेष काय. भाजपने केलेल्या कामाची उद्धघाटने तुम्ही करत आहात, अशी टिकाही तुमच्यावर होत आहे, त्या प्रश्नावर आमदार चव्हाण म्हणाले, विकास कामे माझ्या पत्राने मंजूर झाली आहेत. त्याच्या मंजुरीचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यांनी कधीही तशी पत्रे दाखवावीत. 

ज्येष्ठ नेते विलसराव पाटील-उंडाळकर व तुमच्या गटाचे एकत्रीकरण सुरू आहे का, यावर आमदार चव्हाण म्हणाले, ज्येष्ठ नेते विलासराव पाटील पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या घराला स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा आहे. त्या घराने देशबांधणीत काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यासह त्या घराबद्दल मला आदरच आहे. देश एकसंघ ठेवण्याचा विचार करणारे उंडाळकर कुटूंब कधीही जातीयवादी पक्षाला मदत करणार नाहीत. 

डायरीचे चावडी वाचन करा 
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या खिशातील डायरी आमच्याकडे आली आहे, अशी टिका अतुल भोसले जाहीर सभेत करत आहेत. त्याबाबत विचारले असता आमदार चव्हाण म्हणाले, डायरीच तुमच्याकडे आली आहे, तर त्या डायरीचे तुम्ही चावडी वाचन करावे. सगळ्यांना कळू दे ना त्या डायरीत काय आहे ते. त्यामुळे त्या डायरीचे बिनधास्त वाचन करावे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com