Chatrapati Shahu Maharaj Taking Review daily About Family Health | Sarkarnama

छत्रपती घराण्यात 'टेक केअर' पॅटर्न; श्रीमंत शाहू महाराजांकडून रोज आढावा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी 'न्यू पॅलेस' परिसरातील कुटुंबीयांसाठी टेक केअर चा पॅटर्न राबवला आहे. या कुटुंबियांतील प्रत्येकाच्या प्रकृतीचा फीड बॅक घेऊन त्याची नोंद ठेवली जात आहे

कोल्हापूर  : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी 'न्यू पॅलेस' परिसरातील कुटुंबीयांसाठी 'टेक केअर' चा पॅटर्न राबवला आहे. या कुटुंबियांतील प्रत्येकाच्या प्रकृतीचा फीड बॅक घेऊन त्याची नोंद ठेवली जात आहे. गेले तीन दिवस त्यांचा हा पॅटर्न सुरू असून, प्रत्येकाची ते आस्थेवाईकपणे चौकशी करत आहेत.

शाहू छत्रपती महाराज राहत असलेल्या न्यू पॅलेस परिसरात अनेक कुटुंबे आहेत. त्या कुटुंबातील सदस्यांची एकूण संख्या सुमारे नव्वद आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण- तरुणी, लहान मुले-मुली यांचा त्यात समावेश आहे. दोन वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून या सर्वांची यादी तयार केली आहे. त्यामध्ये कुटुंब प्रमुखाचे नाव, त्यांच्यातील सदस्यांची नावे, त्यांचे वय, मोबाईल नंबर, व्यवसाय यांची नोंद करण्यात आली आहे. 

दररोज सकाळी महाराज मोबाइलद्वारे कुटुंब प्रमुखाशी संपर्क साधून कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या प्रकृतीची विचारणा करतात. कोण बाहेर गेले होते का, कोण परगावाहून आले आहे का, त्यांची प्रकृती कशी आहे, याची ते आपुलकीने चौकशी करत आहेत. गेल्या तीन दिवसांत एकाही कुटुंबातील सदस्य आजारी पडलेला नाही. सर्वांची प्रकृती चांगली असल्याचा निष्कर्ष असला तरी प्रत्येकाने एकमेकांची काळजी घेत एकमेकांपासून दूर राहावे, असा सल्लाही ते देत आहेत.

याबाबत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, "शासनाकडे या पद्धतीचा फीड बॅक प्रत्येकाने लवकरात लवकर पोचवणे गरजेचे आहे. मात्र, एकमेकांच्या संपर्कात न येता मोबाईलद्वारे लोकांची चौकशी करावी. एखादा आजारी असेल तर त्याच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला क्‌ळवावे. ग्रामपंचायत, महापालिकेने लोकांच्या प्रकृतीचा अहवाल लवकर तयार करून शासनाला पाठविल्यास नेमकी स्थिती लक्षात येईल."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख