Chandwad BJP Mla Rahul Aher says Alliance with Sena is Intact Here | Sarkarnama

भाजप आमदार राहूल आहेर म्हणाले....राज्यात काहीही होवो, चांदवडला भाजप- शिवसेना युती अभेद्य!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 15 डिसेंबर 2019

विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात शिवसेना, भाजपची साथ सुटली. दोन्ही कॉंग्रेससह शिवसेनेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले, असे असले तरीही चांदवड मतदारसंघात मात्र शिवसेना भाजपबरोबरच दिसते आहे.

नाशिक : विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात शिवसेना, भाजपची साथ सुटली. दोन्ही कॉंग्रेससह शिवसेनेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले, असे असले तरीही चांदवड मतदारसंघात मात्र शिवसेना भाजपबरोबरच दिसते आहे. येथील भाजप आमदार डॉ. राहुल आहेर म्हणाले, "राज्यात किंवा जिल्ह्यात पक्षांची गणिते बदलली असली तरी चांदवडमध्ये भाजप- शिवसेना मित्रपक्षांची महायुती अभेद्यच आहे.''

विधानसभा निकालानंतर भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांनी निमगव्हाण येथील समर्थ लॉंन्स येथे आभार मेळावा घेतला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे नेते व्यासपीठावर होते. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त झाले.

आमदार डॉ आहेर यावेळी म्हणाले, ''राज्याची राजकीय गणिते काहीही असोत, परंतु चांदवडमध्ये भाजप शिवसेनेची घट्ट झालेली वीण कधीही तुटणार नाही. विकासासाठी आम्ही सर्व सोबतच राहु. चांदवड तालुक्‍याने 2014 च्या निवडणुकीत मला अकरा हजार मते दिली होती, परंतु या निवडणुकीत तब्बल अठ्ठेचाळीस हजार मते दिल्याने मी चांदवडकरांचे ऋण कधीच विसरणार नाही.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही "राजकीय स्थित्यंतरांमुळे आमदारांचे मंत्रीपद हुकल्याने हळहळ व्यक्त केली, त्यावर खुलासा करतांना मतदारांनी त्यांचे काम केले आहे त्यामुळे आपल्याला पळ काढता येणार नाही. त्यासाठी विरोधी बाकावर बसलो असलो तरी कामांसाठी कोणतीही कसुर ठेवणार नाही. तसेच जनतेने मंत्रीपद मिळाले, न मिळाले याबाबत विचार करु नये. सर्वांनी चेहऱ्यावर हसू ठेवावे. पुन्हा नव्या उमेदीने आपण कामाला लागू," 

शिवसेनेचे नितीन आहेर, शांताराम ठाकरे यांचीही भाषणे झाली. त्यांनी आमदार डॉ राहुल आहेरांची साथ सोडणार नसुन पक्षाच्या वतीने विकासासाठी सहकार्य करण्याचे सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने लॉंन्स तुडुंब भरले होते. यावेळी बाजार समितीचे सभापती डॉ आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर, उपनगराध्यक्ष भुषण कासलिवाल, डॉ. नितीन गांगुर्डे, जेष्ट नेते कारभारी आहेर, बाळासाहेब माळी, अशोक काका व्यवहारे, शिवसेनेचे शहराध्यक्ष संदीप उगले, एकलव्य संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब गांगुर्डे, सरपंच गिता झाल्टे, आर. पी. आय संघटनेचे राजाभाऊ आहिरे आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख