मुख्यमंत्रीपद...दादांच्या नावाची चर्चा तर होणारच ! 

दादा पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. पुर्वी प्रकाश जावडेकर हे मतदार संघाचे आमदार होते. दहा वर्षापुर्वी दादांनी पहिल्यांदा या मतदार संघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. सलग दोन वेळा ते या मतदार संघातून निवडून आले आहेत. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना मतदार संघ शोधावा लागणार आहे. राधानगरी-भुदरगडमधून ते रिंगणात उतरतील अशी शक्‍यता आहे. पण या मतदार संघातील कॉंग्रेसच्या काही दिग्गज मंडळींना उमेदवारी देण्याच्या शब्दावर पक्षात घेतल्याने दादांचा मतदार संघ कोणता ? असा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.
मुख्यमंत्रीपद...दादांच्या नावाची चर्चा तर होणारच ! 
मुख्यमंत्रीपद...दादांच्या नावाची चर्चा तर होणारच ! 

विद्यार्थीदशेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या चळवळीत कार्यरत, त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते, त्यातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी निर्माण झालेले जवळचे नाते आणि कोणत्याही वादात न पडता आपल्या कामाशी एकनिष्ठ व प्रामाणिक राहण्याच्या स्वभावामुळे राज्याच्या राजकारणात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा दबदबा वाढत आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाने राज्याचे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री बनलेले दादांचे पाय इतके जमिनीशी घट्ट आहेत की 10 तारखेच्या वाढदिवसाला हारतुऱ्यांऐवजी चक्‍क खते देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

विद्यार्थी परिषदेत कार्यरत असताना विजार, शर्ट आणि खांद्याला शबनम बॅग अडकून फिरणाऱ्या दादांवर आरएसएसमध्ये आल्यानंतर पक्षाची ध्येयधोरणे कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात रूजवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. दादा मूळचे कोल्हापुरचे त्यामुळे या परिसराची खडा न्‌ खडा त्यांना माहिती. पक्षाचे काम करायचे पण उदरनिर्वाहासाठी काय तर हवे म्हणून त्यांनी बागल चौकातच टेलिमॅटीक ही खाजगी संस्थांना बिनतारी संदेश यंत्रणा, सीसीटीव्हीची यंत्रणा पुरवणारी कंपनी सुरू केली. 

फार मोठी राजकीय पार्श्‍वभुमी म्हणावी तर तीही नाही. एवढेच काय दहा-बारा वर्षापुर्वी दादा कोण? हेही लोकांना माहित नव्हते. पण राज्यात 2014 साली भारतीय जनता पार्टीचे सरकार आले आणि दादांचे नांव केवळ कोल्हापुरातच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचले. मंत्रीमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे ते मंत्री झाले आणि सारा महाराष्ट्र त्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहू लागला. भविष्यात भाजपच्या सत्ताकाळात मुख्यमंत्री बदलाची ज्यावेळी चर्चा होईल, त्यावेळी दादांचे नांव आघाडीवरच असेल. आपण त्या स्पर्धेत नसल्याचे ते सांगत असले तरी त्यांच्या नावाची चर्चा तर होणारच. 

कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्र हा दोन्ही कॉंग्रेसचा बालेकिल्ला. या भागात भाजापाचे पाय रोवायचे तर एकतर मराठा नेता पाहीजे आणि त्यांच्याकडे डावपेच असले पाहीजेत. हे दोन्ही गुण अर्थातच दादांकडे आहेत. त्यामुळे पक्षानेही त्यांच्यावर पश्‍चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली आहे. प्रस्थापित नेत्यांना पक्षात घेऊन दादांनीही मग भाजपाचा झेंडा गावोगावी पोचवण्याचे काम सुरू केले आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर कोल्हापूर या कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात तत्कालिन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याविरोधात अवघ्या दहा-पंधरा दिवसांत माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्या मुलाला उभे करून त्यांना निवडूनही आणण्याचे काम दादांनी केले. नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीतही प्रस्थापित नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी भाजपाचा झेंडा फडकवत ठेवला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाच नगरपालिका व जिल्हा परिषद आज भाजपच्या ताब्यात आहेत. 

चंद्रकातंदादांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे येतील ते नेते भाजपमध्ये घेतले. काही ठिकाणी सोयीनुसार आघाड्या केल्या,"कमळच घ्या' असा आग्रह केला नाही. यामुळे दादांनी पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपची चांगलीच हवा निर्माण केली आहे. त्यात सरकारच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिलेलाआहे. शेतकरी संप मिटवण्यासाठी झालेल्या तडजोडीत ते आघाडीवर होते. सरकारमधील त्यांची वाढलेली ताकद पाहून दोन्ही कॉंग्रेसचे अनेक दिग्गज त्यांच्या संपर्कात आले आहेत. दादा जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या जिल्ह्यात माजी मंत्री एकनाथ खडसे व मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वादाने टोक गाठले आहे. त्यात पक्षाचे नुकसान होत असल्याचे निदर्शनाला आल्यानंतर दादांनी या दोघांत समेट घडवून आणण्याचे प्रयत्न केले. त्यांना यश आले नसले तरी पक्षाची ताकद मात्र या जिल्ह्यात कायम ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत . नुकत्याच जाहीर झालेल्या कर्जमाफीसंदर्भात समितीचे अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर सोपवले आहे. क्‍लिष्ट विषयांत मार्ग काढण्यात त्यांचा हातखंडा आहे, आता पेटलेल्या शेतकरी आंदोलनावरही ते नक्‍की मार्ग काढतील! 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com