`चंद्रकांतदादा पाटलांनी सर्वाधिक त्रास मला दिला...`

`लोकांची आस्थेवाईकपणे चौकशी केली असती, प्रत्येक व्यक्तीच्या समस्या ऐकल्या असत्या तर कोल्हापूरच्या लोकांनी तुम्हाला डोक्‍यावर घेतले असते`
`चंद्रकांतदादा पाटलांनी सर्वाधिक त्रास मला दिला...`

कोल्हापूर : आमचं काय चुकलं, टोल रद्द केला, एलबीटी घालवली,' असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगतात; पण तुम्ही लोकांचे प्रेम मिळवू शकला नाहीत, लोकांचं काळीज तुम्ही पकडू शकला नाहीत. सत्तेच्या मस्तीत राहिल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत दिसला, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी लगावला.

आमदारपदी निवड झालेल्या जिल्हा बॅंकेचे संचालक श्री. मुश्रीफ यांच्यासह राजेंद्र पाटील-यड्रावकर, राजेश पाटील यांचा बॅंकेत आज सत्कार झाला. कार्यक्रमात श्री. मुश्रीफ यांनी पालकमंत्री पाटील यांच्यावर चौफेर टोलेबाजी केली.

इथे उणीदुणी काढण्यात काही अर्थ नाही. गेली काही दिवस पालकमंत्री आणि प्रा. संजय मंडलिक यांच्यातील कलगीतुरा पाहत आहोत, असे सांगून श्री. मुश्रीफ म्हणाले, ""शहरातील टोल हा सदाशिवराव मंडलिक, गोविंद पानसरे आणि डॉ. एन. डी. पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून रद्द झाला. एलबीटी आमचे सरकार असतानाच रद्द झाला होता. जिल्ह्यात दिसणारे कोणतेही मोठे काम दोन नंबरचे मंत्रिपद असतानाही श्री. पाटील करू शकले नाहीत, हे दुर्दैवी आहे.''

ते म्हणाले, ""पाच वर्षे तुम्ही पोलिसांच्या गराड्यात, आंदोलन-चळवळी दडपण्यात, घराकडे भेटायला येणाऱ्या माणसांचा अपमान करण्यात घालवली. वेळ घेतल्याशिवाय भेटायचे नाही, हे लोकांना रुचले नाही. लोकांची आस्थेवाईकपणे चौकशी केली असती, प्रत्येक व्यक्तीच्या समस्या ऐकल्या असत्या तर कोल्हापूरच्या लोकांनी तुम्हाला डोक्‍यावर घेतले असते. जिल्ह्यातील लोकांचा विश्‍वास मिळवण्याबरोबरच या लोकांना हाताच्या फोडासारखे जपण्याचे काम तुमच्या हातून झाले नाही. याचेच हे परिणाम निवडणुकीत दिसले.''

सत्ता आल्यानंतर लोकांच्या विचाराने काय केले नाही, तर काय घडते हे दिसले. त्यातून ही सूज उतरली आहे. श्री. पाटील यांचे हेच चुकले आहे, पुढच्या काळात ते सुधारतील, त्यातून पुन्हा एकदा ते जनतेचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न करतील, असा टोलाही लगावला.

सर्वाधिक त्रास मला
सर्वाधिक त्रास श्री. पाटील यांनी मला दिला. जिल्हा बॅंकेत "88 चा' निकाल द्यावा लागला, त्याला स्थगिती मिळवली. मला बॅंकेतून काढण्यासाठी दहा वर्षांपूर्वीचा आदेश त्यांनी काढला. जिल्हा बॅंकेत दोन्हीही कारवायांना स्थगिती आणल्यानंतर राज्य बॅंकेची 88 खाली चौकशी लावली. अजित पवार यांना सांगितले, की हसन मुश्रीफ यांच्यामुळे ही कारवाई करतो. यालाही आम्ही रोखले, म्हणून तुम्ही ईडीकडे तक्रार केली. फक्त माझ्यामुळे ईडीचा गुन्हा नोंद केला. मी शरद पवार यांनाही हे सर्व सांगितले. त्यानंतर प्राप्तिकर विभागाची धाड टाकली. एखाद्या राजकारणात विचार आणि मतभेद वेगवेगळे असू शकतात; पण त्या वैचारिक पद्धतीने हे केले पाहिजे. अशा प्रकारे सत्तेचा वापर केला तर त्याचे दुष्परिणाम राज्यभर दिसतील, असेही श्री. मुश्रीफ म्हणाले.

सत्ताच आली असती
विधानसभा निवडणुकीत जनतेचा रोष सरकारविरोधात होता हे आम्हाला समजले. त्यातून आमचेच सरकारच आले असते; पण ते थोडक्‍यात निसटले. कुठे एमआयएमचा, कुठे वंचितचा तोटा झाला, कुठे आमच्या उमेदवाराला कमी मते मिळाली, काही जागा कमी मताने पडल्या, पण हा निकाल बोध घेण्यासारखा आहे, असे श्री. मुश्रीफ म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com