chandrashekhar bavankule campaign | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांमुळेच ओबीसी मंत्रालय - पालकमंत्री बावनकुळे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

कॉंग्रेसने 65 वर्षे राज्य केले. मात्र, भाजपच्या अवघ्या पाच वर्षांच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मंत्रालयाची स्थापना करून समाजावरील अन्याय दूर केल्याने भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

हिंगणा - कॉंग्रेसने 65 वर्षे राज्य केले. मात्र, भाजपच्या अवघ्या पाच वर्षांच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मंत्रालयाची स्थापना करून समाजावरील अन्याय दूर केल्याने भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

हिंगणा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार समीर मेघे यांच्या प्रचारासाठी गुमगाव, कान्होलीबारा, हिंगणा आणि वाडी येथील जाहीर सभांना त्यांनी संबोधित केले. 

यावेळी सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यासह समीर मेघे, खासदार विकास महात्मे, गिरीश देशमुख, विशाल भोसले, उमेश आंबटकर, रवी जोडांगळे, श्‍यामसुंदर मणियार, वर्षा शाहकार, सतीश शहाकार, किशोर बिडवाईक, गुणवंतराव मते, सुरेश खोंडे, संजय बुधे आदी उपस्थित होते.

घड्याळ बंदच ठेवा
चार लाख नागरिकांच्या भवितव्याची ही निवडणूक आहे. शासनाच्या 45 योजना या मतदारसंघात आणून गरिबांना त्याचा लाभ द्यायचा असेल तर समीर मेघे यांना निवडून आणणे गरजेचे आहे. त्यामुळे 10 वाजून 10 मिनिटांनी राष्ट्रवादीचे बंद पडलेले घड्याळ बंद राहू द्या, असेही बावनकुळे म्हणाले.

माझ्यावर अन्याय नाही
माझ्यावर पक्षाने कोणताही अन्याय केला नाही. उलट मला पूर्व विदर्भातील 32 विधानसभा मतदारसंघांच्या प्रचारप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. तेली समाज नाराज आहे, असा गैरसमज पसरवला जात आहे. पण वस्तुःस्थिती तशी नाही. जातीच्या आधारावर कोणतेच मतदान करू नका. आमदार हा गुणवत्तेनुसार ठरत असतो, असेही बावनकुळे म्हणाले.

गोसेखुर्द बुडीत क्षेत्राचा आराखडा
गोसेखुर्द प्रकल्पात गेलेल्या बुडीत क्षेत्राचा आराखडा कॉंग्रेसने पंधरा वर्षांत तयार केला नाही. भाजपने तो तयार करून गोसेखुर्दमधील जे प्रकल्पग्रस्त पुनवर्सन व मदतीपासून वंचित आहेत, त्यांच्यावर आता अन्याय होणार नाही, अशी माहिती पालकमंत्र्यांनी आज वेलतूर येथील जाहीर सभेत दिली. याप्रसंगी भाजपचे उमरेड विधानसभेचे उमेदवार सुधीर पारवे, आस्तिक पाटील सहारे, जिल्ह्याचे महामंत्री अरविंद गजभिये, भागेश्वर फेंडर, डॉ. मेश्राम, सुरेश बोराडे, भीमराव मातीखाये, आनंद खडसे, श्रीमती रजनी लोणारे, डॉ. प्रतिभा मांडवकर, श्रीमती वानखेडे व अन्य उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख