अजित पवारांच्या विरोधात शड्डू ठोकण्यास चंद्रराव तावरे तयार

ajit pawar -taware
ajit pawar -taware

बारामती शहर : आगामी विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांच्या मंगळवारी (ता. 27) सासवड येथे मुलाखती होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा उपाध्यक्ष अँड. नितीन भामे यांनी दिली. राज्यातील सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल याबाबत औत्सुक्याचे वातावरण आहे.

दरम्यान कोणत्याही इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन न करता आपली माहिती घेऊन मुलाखतीसाठी हजर राहण्याचे निर्देशही पक्षीय पातळीवर देण्यात आले आहेत. बारामतीसोबतच पुरंदर, इंदापूर, दौंड व भोर विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्याही मुलाखती सासवडला होणार आहेत. पक्षाचे निरिक्षक रवींद्र चव्हाण व जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे या मुलाखती घेणार आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार बारामतीतून चंद्रराव तावरे, बाळासाहेब गावडे, रंजन तावरे, प्रशांत नाना सातव हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. चंद्रराव तावरे हे माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष, शरद पवारांचे जुने सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी अजित पवार यांच्या पॅनेलचा माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत दोनदा पराभव केला होता. त्यामुळे ते पुन्हा अजित पवारांच्या विरोधात लढणार का, याची उत्सुकता राहणार आहे. अजित पवारांच्या विरोधात उमेदवार मिळविण्यासाठी विरोधकांना राष्ट्रवादीतच फोडाफोडी करावी लागते. यावेळी मात्र चार जण त्यांच्या विरोधात लढण्यासाठी तयार झाले आहेत.

विशेष म्हणजे दिलीप खैरे हे मुलाखत देणार नसल्याचे त्यांनी स्वत: सांगितले. मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे, पक्ष ज्या सूचना देईल, त्या नुसार मी काम करतो, त्यामुळे मी मुलाखत ठिकाणी उपस्थित असेन पण मी इच्छुक म्हणून मुलाखत देणार नाही, असे दिलीप खैरे यांनी सांगितले.

चंद्रराव तावरे, बाळासाहेब गावडे, रंजन तावरे या तिघांनीही या अगोदर विधानसभा निवडणूक लढविली आहे. प्रशांत सातव यांना संधी मिळाल्यास ते प्रथमच आमदारकीची निवडणूक भाजपकडून लढवतील. दुसरीकडे ज्या मतदारसंघात दुस-या क्रमांकाची मते युतीतील ज्या पक्षाला मिळाली आहेत, त्यांची त्या मतदारसंघावर प्रबळ दावेदारी असेल, असे सांगितले गेले. या निकषाचा विचार करता बारामतीत भाजपच्या उमेदवाराचीच मते जास्त होती. या मुलाखतीचा अहवाल भाजप राज्य कार्यकारिणीकडे पाठविला जाणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com