चंद्रराव तावरे यांचा बारामतीच्या रिंगणातून लढण्यास नकार

चंद्रराव तावरे यांचा बारामतीच्या रिंगणातून लढण्यास नकार

बारामती शहर : आगामी विधानसभा निवडणूकीसाठी बारामती विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर आमदारकीची निवडणूक लढविण्यासाठी आज सहा जणांनी पक्षाकडे अधिकृतपणे इच्छा व्यक्त केली.

दरम्यान माळेगावचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही, पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचा प्रचार निश्चित करु असे सांगितले. 

माळेगावचे विद्यमान अध्यक्ष रंजन तावरे यांनीही ही जागा वाटपात शिवसेनेकडे आहे, जर चर्चेदरम्यान ही जागा भाजपला मिळाली आणि पक्षाने आदेश दिला तर आम्ही निवडणूक लढवू अशी भूमिका घेतली आहे. पक्षसूचनेनुसार आज सासवडला या प्रक्रीयेत आम्ही सहभागी झालो असल्याचेही रंजन तावरे यांनी स्पष्ट केले. 

एकीकडे चंद्रराव तावरे यांनी निवडणूकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असताना दुसरीकडे रंजन तावरे यांनीही सावध भूमिका घेतली आहे तर भाजपच्या वाटयाला ही जागा आली तर ज्यांना प्रबळ दावेदार समजले जात होते ते बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, अविनाश मोटे, प्रशांत नाना सातव हे या प्रक्रीयेपासून आज दूर असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

बारामती मतदारसंघावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच लक्ष केंद्रीत केलेले असल्याने बारामतीबाबत शेवटच्या क्षणी काही वेगळी रणनीती समोर येते की काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे. 

आज सासवड येथे झालेल्या मुलाखती दरम्यान रंजन तावरे, कुलभूषण कोकरे, गोविंद देवकाते, अभिजित देवकाते, सुरेंद्र जेवरे, राहुल तावरे यांनीही उमेदवारी मागितली आहे अशी माहिती अँड. नितीन भामे यांनी दिली.  पक्षाचे निरिक्षक रवींद्र चव्हाण यांनी इच्छुकांशी चर्चा केली. 

आज सासवड येथे झालेल्या मुलाखतींसाठी कोण उघडपणे उमेदवारी मागणार या बाबत बारामतीत उत्सुकता होती. मात्र प्रमुख दावेदारांनी उमेदवारीसाठी इच्छा प्रदर्शित न केल्याने भाजपच्या मनात नेमके काय आहे, या बाबत चर्चेला उधाण आले आहे. 

बारामतीत गेल्या पंचवीस वर्षात अजित पवार यांना पराभूत करणे कोणालाच शक्य झालेले नाही असा इतिहास आहे. बारामती मतदारसंघावरील त्यांची पकड विचारात घेता त्यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार देण्याचा भाजप सेना युतीचा प्रयत्न आहे. ही जागा शिवसेनेकडे असली तरी चर्चेदरम्यान जो निर्णय होईल तो दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मान्य केलेला असल्याने शेवटच्या क्षणी काय घडणार या कडे सर्वांचेच लक्ष आहे.

 राष्ट्रीय समाज पक्षाकडूनही बारामतीत उमेदवार दिला जाणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ही लढत सरळ होणार की तिरंगी होईल या बाबतही आता चर्चा सुरु झाली आहे. 

गणेशोत्सवानंतर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारीबाबतच्या हालचाली वेगवान झाल्या आहेत. शेवटच्या क्षणी बारामती बाबत युतीमध्ये काय निर्णय होतो या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com