चंद्रपुरातील `पार्षद'च्या `कर्तुत्वा'ने आमदार शामकुळे संतापले 

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण पोलिसांनी हटविल्यानंतर अतिक्रमणधारकांनी कारवाईचे खापर आमदार नाना शामकुळे यांच्यावर फोडले. त्यांच्या विरोधात धरणे दिले. भाजपच्याच एका नगरसेवकाने हे अतिक्रमण करायला लावले होते. हा नगरसेवक शहरात `पार्षद' म्हणून ओळखला जातो. त्याच्या गाडीवरही `पार्षद' लिहिले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शामकुळेंना या `पार्षद'च्या `कर्तृत्वा'चे चटके बसल्याने तेही चांगलेच संतापले आहेत.
चंद्रपुरातील `पार्षद'च्या `कर्तुत्वा'ने आमदार शामकुळे संतापले 

चंद्रपूर : शासकीय जमिनीवरील अतिक्रमण पोलिसांनी हटविल्यानंतर अतिक्रमणधारकांनी कारवाईचे खापर आमदार नाना शामकुळे यांच्यावर फोडले. त्यांच्या विरोधात धरणे दिले. भाजपच्याच एका नगरसेवकाने हे अतिक्रमण करायला लावले होते. हा नगरसेवक शहरात `पार्षद' म्हणून ओळखला जातो. त्याच्या गाडीवरही `पार्षद' लिहिले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शामकुळेंना या `पार्षद'च्या `कर्तृत्वा'चे चटके बसल्याने तेही चांगलेच संतापले आहेत. 

तुकूम प्रभाग क्रमांक एकमधील ख्राईस्ट हॉस्पिटलच्या समोर ही जागा आहे. शासनाने आम्हाला कब्रस्थानसाठी जागा दिली, असे चर्चचे म्हणणे आहे. शासकीय दस्तऐवजात जागा महसूल विभागाची असल्याचे समजते. या जागेच्या बाजूला होमगार्डचे मैदान आहे. समोर कब्रस्थान आणि आजूबाजूला घरे झाली आहे. अनेक वर्षांपासून ही जागा मोकळी आहे. यापूर्वी अनेकदा या जागेवर अतिक्रमणाचे अयशस्वी प्रयत्न झाले. यावेळी याच प्रभागातील भाजपच्या एका नगरसेवकाची (पार्षद) नजर या जागेवर पडली. 

जागा हडप करण्यासाठी आधी त्यांनी एकाला बांधकाम करायला लावले. त्यानंतर काही गरीब कुटुंबातील लोकांना हाताशी पकडले. 'तुम्ही अतिक्रमण करा, तुम्हाला जमिनीचे पट्टे मिळवून देतो. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी माझे बोलणे झाले आहे', अशी थापही त्याने या लोकांना मारली. 

घर नसलेली, मजुर वर्गातील ही मंडळी या `पार्षद'च्या भूलथापांना बळी पडली. रविवारी कुटुंबीयांसह हे लोक मोठ्या संख्येत या परिसरात आले. जमेल तशी जागा पकडायला सुरवात केली. काहींनी घरांची उभारणी करण्यासाठी विटा, सिमेंटचे खांबही बोलविले. यावेळी हा पार्षद तेथेच होता. चर्चच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. तेव्हा त्यांच्याकडे जागेचा सातबारा दाखविण्याची मागणी केली. 

दरम्यान या अतिक्रमणाची चर्चा परिसरात पोहोचली आणि इतर लोक तिथे गोळा झाली. रविवार असल्याने प्रार्थना करण्यासाठी चर्चमध्ये ख्रिस्ती समाजातील लोक मोठ्या संख्येत होते. शेवटी परिस्थिती आपल्या विरोधात जात असल्याचे बघून या पार्षदने तेथून पळ काढला. प्रकरण आमदार, पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचले. रात्री पोलिस आले आणि अतिक्रमण काढून फेकले. 

आता या ठिकाणी चर्चने जागा आमच्या मालकीची आहे, असा फलक लावला आहे. प्रकरण होऊन दोन दिवसांचा अवधी उलटल्यानंतर आज अतिक्रमणधारक महिलांनी धांडे हॉस्पिटलसमोर आमदार शामकुळेंच्या विरोधात धरणे दिले. शामकुळे यांच्या सांगण्यावरूनच पोलिसांनी अतिक्रमण हटविले आणि आम्हाला मारहाण केली, असा आरोप या महिलांनी केला. परंतु प्रत्यक्षदर्शीनुसार पोलिसांनी कुणालाही हात लावला नाही. 

पोलिसी कारवाईमुळे `पार्षद'चे जमीन लाटण्याचे मनसुबे उधळले गेले. या जागेवर पक्षाचे कार्यालय बांधणार आहे, असेही हा पार्षद सांगत होता. याआधी राष्ट्रवादी नगर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातही त्याने जागा लाटण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. प्रत्येक वेळी तोंडघशी पडण्याचीच वेळ त्याच्यावर आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com