तावडे, बावनकुळे यांना सोडले नाही तर तुम्ही कोण? : कामचुकारांना चंद्रकांतदादांचा दम

पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी नवनिर्वाचित आमदार, खासदार, गटनेते, नगरसेवक आणि पदाधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी ही झाडाझडती केली.
तावडे, बावनकुळे यांना सोडले नाही तर तुम्ही कोण? : कामचुकारांना चंद्रकांतदादांचा दम

पुणे : आठपैकी दोन मतदारसंघांत गमवाव्या लागलेल्या जागा, सहा मतदारसंघांत कमी झालेले मताधिक्‍य यावरून शहर भाजपमध्ये झाडाझडतीला सुरवात झाली आहे. ""पहिल्यासारखा पक्ष राहिलेला नाही. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाने सोडले नाही, तर तुम्हाला सोडणार आहे का?'' अशा शब्दांत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. महापालिकेच्या कामकाजावरही या वेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत आठही मतदारसंघांत पक्षाच्या उमेदवारांना मिळालेली मते, काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मते आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांना मिळालेली मते यांची माहिती द्या. कोणी काम केले, कोणी नाही केले, मित्रपक्षांची किती मदत झाली, याची माहिती जमा करून येत्या चार दिवसांत अहवाल द्या, असा आदेश त्यांनी पक्षाचे सरचिटणीस यांना दिला, त्यामुळे शहर पातळीवरील भाजपचे नेते आणि नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत.

शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत गेल्या निवडणुकीत शहर भाजपला दणदणीत यश मिळाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाच्या उमेदवारांना सर्वच मतदारसंघांतून भरघोस मताधिक्‍य मिळाले होते. मात्र, या वेळी दोन मतदारसंघांतील जागा पक्षाला गमवाव्या लागल्या. पर्वती आणि कसबा वगळता चार मतदारसंघांत विजयासाठी पक्षाच्या उमेदवारांना कडवी झुंज द्यावी लागली. या पार्श्‍वभूमीवर पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी नवनिर्वाचित आमदार, खासदार, गटनेते, नगरसेवक आणि पदाधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी ही झाडाझडती केली. त्यामुळे पक्षात हा चर्चेचा विषय झाला आहे.
पूर्वीची पार्टी राहिलेली नाही, माझे चुकले तरी मलाही माफी मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही कोणीही गैरसमजुतीमध्ये राहू नका. महापालिकेत ज्या पद्धतीने कामकाज सुरू आहे, ते योग्य नाही. त्याचादेखील फटका पक्षाला बसला आहे. सर्वांनीच काम केले, तर लाखाचे लीड वीस हजारावर कसे आले, असा प्रश्‍नही पाटील यांनी केला. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी घेऊन कुठे कमी मते मिळाली, याची माहिती घेण्यासाठी विधानसभानिहाय सरचिटणीसांची नेमणूक करून अहवाल सादर करण्याचा आदेश पाटील यांनी दिला.

दोन नेत्यांमध्ये बाचाबाची
बैठकीत चर्चेदरम्यान पक्षाच्या शहरातील दोन नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. चेहरे पाडून बसू नका, 140 पैकी 105 जागा आपण जिंकल्या आहेत. टेन्शन न घेता काम करा, असा सल्ला एका नेत्याने दिला. त्यावर दुसऱ्या नेत्याने एन्जॉय कसले करता, शहरात दोन जागा गेल्या. जिल्ह्यातदेखील पक्षाला मोठा फटका बसला. कोणी काम केले, कोणी काम नाही केले, याचा जाब विचारा, असे सुनावले. त्यावरून शाब्दिक चकमक झाली, तेव्हा पाटील यांनी मध्यस्थी करीत वाद मिटविला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com