चंद्रकांतदादा पाटील शोधताहेत कोल्हापुरात योग्य मतदारसंघ

 चंद्रकांतदादा पाटील शोधताहेत कोल्हापुरात योग्य मतदारसंघ

कोल्हापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकण्याची तयारी सुरू केली आहे. मंत्री पाटील यांचे होमपीच असलेल्या राधानगरी मतदारसंघासह कोल्हापूर उत्तरमधून त्यांनी चाचपणी सुरू केली आहे. त्यातही उत्तरला त्यांचे प्राधान्य राहील. निवडणुकीसाठी आवश्‍यक कागदपत्रे उपलब्ध करण्यासाठी मंत्री पाटील यांच्या गोटातील खास यंत्रणा कामाला लागली आहे. 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्‍यता आहे. मात्र, भाजप-शिवसेना युतीवर अजून शिक्‍कामोर्तब झालेले नाही. युतीचा निर्णय अजून गुलदस्त्यात आहे. त्यामुळेच दोन्हीही पक्ष सावध भूमिका घेत आहेत. युती होवो की न होवो, कोल्हापूर जिल्ह्यात मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर मंत्री पाटील यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता; मात्र भाजपच्या एका बड्या पदाधिकाऱ्याने मंत्री पाटील यांना लढण्याची सूचना केली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार पक्षातील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी चाचपणी सुरू केली आहे. 

मंत्री पाटील यांचे होमपीच गारगोटी आहे. त्यामुळे राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह होत आहे. हा मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाट्याला आहे. येथून शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर पुन्हा रिंगणात असणार आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांत मंत्री पाटील व आमदार आबिटकर यांच्यात मोठे वितुष्ट निर्माण झाले. आमदार आबिटकर यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रमुख नेते गट-तट विसरून मंत्री पाटील यांच्या संपर्कात आहेत. मंत्री पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली तर बहुतांश नेते त्यांच्या पाठिशी राहतील, अशी परिस्थिती आहे. युती झाली तर ही जागा शिवसेनेकडून काढून घेण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. 

राधानगरी-भुदरगड मतदारसंघाप्रमाणेच पालकमंत्री पाटील यांचे कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर लक्ष आहे. सध्या हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मात्र, मागील निवडणुकीत भाजपला झालेले मतदान, शहरी मतदारांचा कल, मंत्री पाटील यांनी विविध संस्था, तालीम, मंडळांना केलेली मदत पाहता उत्तरमधून लढण्यासाठी श्री. पाटील यांनी प्राधान्य दिले जात असल्याचेही सांगण्यात येत आहे. ज्या पद्धतीने निवडणुकीसाठी जमवाजमव सुरू आहे, ती पाहता युती होवो किंवा न होवो, मंत्री पाटील विधानसभेच्या आखाड्यात शड्डू ठोकतील, अशी सध्याची परिस्थिती आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com