चंद्रकांतदादांचे पाकीट पुन्हा योग्य पत्त्यावर पोहोच !

चंद्रकांतदादांचे पाकीट पुन्हा योग्य पत्त्यावर पोहोच !

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची फेरनियुक्ती झाली आहे. पाटील यांच्या नियुक्तीमुळे पुण्यातून निवडून गेलेल्या आमदाराला प्रदेशाध्यक्ष होण्याची संधी जनसंघ तसेच भारतीय जनता पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाली आहे. रामभाऊ म्हाळगी यांनी आमदार म्हणून पुण्याचे नेतृत्व केले. मात्र, त्यांना या पदावर असताना प्रदेश पातळीवरील जबाबदारी मिळाली नव्हती. 

चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या कोणत्याही नव्या जबाबदारीबद्दल पत्रकारांनी विचारले की ते मी पाकिटासारखा आहे. पक्ष लिहिल त्या पत्त्यावर मी जातो, असे ते नेहमी सांगतात. या वेळी त्यांचे पाकीट पुन्हा योग्य पत्त्यावर पोहोचले आहे. ते कोल्हापुरातून पुण्यात आमदार झाले. आता पुण्यातील आमदार भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाल्याने त्यांचे पाकीट आता दुसऱ्यांदा मुंबईच्या पत्त्यावर पोहोचले आहे. 

पक्षाला प्रतिकूल काळ होता त्या काळात रामभाऊ म्हाळगी, अरविंद लेले, अण्णा जोशी, विश्‍वास गांगुर्डे, गिरीश बापट हे जुन्या पिढीतील नेते पुण्यातून आमदार म्हणून निवडून गेले. बापट यांनी पाचवेळा आमदार होण्याचा विक्रम केला. मात्र, यातील कुणालाच राज्याचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले नाही. त्यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी होती. मात्र, पाटील यांच्या रूपाने पुण्याला ही संधी मिळाली आहे. या पदावर चंद्रकांत पाटील यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. 

मात्र, पहिल्यावेळी प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा ते पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून विधान परिषदेवर निवडून गेले होते. पुणे पदवीधर मतदारसंघातून सलग दोनवेळा ते विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहावरून त्यांनी पुण्यातून कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यांच्या उमेदवारीमुळे राज्यात बरीच उलट-सुलट चर्चा झाली. पाटील यांना पराभूत करण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र प्रयत्न झाले. मात्र,25 हजार मतांची आघाडी घेत पाटील विजयी झाले. त्यामुळे पाटील यांच्या रूपाने पुण्याच्या आमदाराला प्रदेशाध्यक्षपदाचा मान पहिल्यांदाच मिळाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com